विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर व्यक्त केलेल्या मताबद्दल भूमिका स्पष्ट केली. राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरातील अनेक शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राणेंच्या वक्तव्याचं आम्ही पक्ष म्हणून समर्थन करणार नाही पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेंच्या मागे ठाम उभे आहोत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेबद्दल बोलताना थेट नाव न घेता पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख केलाय.

नक्की वाचा >> भाजपाच्या कार्यालयांवर हल्ला केला तर…; फडणवीसांचा शिवसैनिकांना इशारा

कायदा जिथे योग्य असेल तिथे कारवाई केलीच पाहिजे असं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. केवळ सरकारला समाधानी करण्यासाठी कारवाई करावी लागली तर महाराष्ट्र पोलिसांच्या दलाची प्रतिमा मलिन होईल, असंही फडणवीस म्हणाले. अर्णब, कंगना पासून सर्व गोष्टींमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला चपराक पडते. पोलिसांना बदला घेण्याचं उपकरण म्हणून वापरणं योग्य नाही, असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राणेंच्या वक्तव्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पण ज्या प्रकारे सरकार बेकायदेशीरपणे पोलिसांचा गैरवापर करतेय ते पाहता संपूर्ण भाजपा राणेंच्या पाठीशी उभा राहणार, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> नारायण राणेंना अटक झाली तर…; भाजपा नेत्याने दिला इशारा

पुढे बोलताना राज्य सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचं फडणवीस म्हणाले. “तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होतं? तुम्ही लाथा घाला म्हणता त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होतं? कोणी चौकीदार चोर आहे म्हणतं त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होतं?,” असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. सरकारची दुटप्पी भूमिका योग्य नाही. भूमिका एकच राहिली पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेची दादरमध्ये राणेंविरोधात पोस्टरबाजी

पुढे बोलताना फडणवीस यांनी खासगी आयुष्यावरुन होणाऱ्या टीकेसंदर्भात आपण कधीही मुद्दा उपस्थित केला नसल्याचं अधोरेखित केलं. “आमचं तर आम्ही बोलतच नाही, आमच्याविरुद्ध आमच्या परिवाराविरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, आमच्या पत्नीविरुद्ध तुम्ही काय काय केलं. तो आमचा वैयक्तिक मामला आहे. आम्ही त्याला सक्षम आहोत. तो माझा प्रश्नच नाही. पण एवढं सांगू शकतो की दुटप्पी भूमिका असू नये,” असं फडणवीस म्हणाले. या वाक्यामधून त्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर त्यांच्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टवरुन होणाऱ्या टीकेबद्दल अप्रत्यक्षपणे वक्तव्य केलं.

नक्की वाचा >> भाजपा नेत्याने नारायण राणेंची बाळासाहेब ठाकरेंशी केली तुलना, म्हणाला, “बाळासाहेब आणि राणे हे…”

नारायण राणे यांना अटक केली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. मी, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात यात्रा सुरू राहील असं फडणवीस यांनी सांगितलं.