काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या ‘प्रहार’ वृत्तपत्रातील ‘वाडी वस्ती’  सदरातील लेखांचे पुस्तक डिम्पल प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी राणे प्रकाशनाची परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा करीत राणे प्रकाशनने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. डिम्पल प्रकाशनने आपल्याकडे परवानगीचे लेखी पत्र असल्याचा दावा केला असला, तरी ‘ज्यांचा या सदराशी काडीमात्र संबंध नसतानाही परवानगी दिली त्यांचा आता दैनिकाशीही संबंध नसल्याचे’ सांगत राणे प्रकाशनाने हा दावा फेटाळून लावला आहे.        
‘प्रहार’ वृत्तपत्रात हे सदर प्रकाशित झाले तेव्हा ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले हे संपादक होते. डिम्पल प्रकाशनाप्रमाणेच अन्य प्रकाशकांनीही हे पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्या सगळ्यांना तत्कालीन संपादक गोडबोले यांनी नकार देऊन राणे प्रकाशनातर्फेच पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. मात्र पत्रकार महेश म्हात्रे यांनी वाडीवस्ती या सदराशी संबंध नसताना त्याच्या प्रकाशनाची परवानगी डिम्पल प्रकाशनाला दिल्याचे सांगण्यात येते.

‘राणे प्रकाशन’च्या परवानगीचे पत्र आहे
‘वाडी वस्ती’ संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. गेले वर्षभर याचे काम सुरू आहे. मात्र तरीही जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी कोणी अशा प्रकारे वातावरण निर्माण करीत असेल तर मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करीन.
– अशोक मुळ्ये, डिम्पल प्रकाशन

हे नैतिकतेला धरून नाही
दैनिकाचे तेव्हाचे संपादक महेश म्हात्रे यांनी राणे प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यास परवानगी दिली होती. आता म्हात्रे यांचा दैनिकाशी किंवा राणे प्रकाशनाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी डिम्पल प्रकाशनाने राणे प्रकाशनाशी संपर्क साधायला हवा होता. तो त्यांनी साधलेला नाही हे नैतिकतेला धरून नाही. कायदेशीर कारवाईबाबत राणे प्रकाशनाच्या संचालक मंडळाशी बोलून निर्णय घेण्यात येईल.
– मनीष राणे, मुद्रक आणि प्रकाशक, राणे प्रकाशन  
हा टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार
जिवंत पत्रकारांच्या, लेखकांच्या आणि चित्रकाराच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. आपण संपादक असताना गाजलेल्या सदरात ज्या शंभर मान्यवरांचे लिखाण प्रसिद्ध झाले, त्यासाठी ज्या सहकारी पत्रकारांनी अडीच ते तीन वर्षे कष्ट घेतले आणि त्याला ज्या पुंडलिक वझे यांनी देखणे चित्ररूप दिले यापैकी कोणालाही न सांगता, श्रेय न देता, परस्पर तिसऱ्याने चौथ्याच्या घशात लोण्याचा गोळा देण्याचा अनैतिक, अश्लाघ्य असा हा प्रकार आहे. पत्रकारांसाठी संघर्ष करणाऱ्या पत्रकारांच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ६ जून रोजी पुण्यात पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, हा आणखी एक दैवदुर्विलास आहे. असा पायंडा पडू न देण्यासाठी पत्रकारांनी आणि प्रकाशकांनीही पुढे यावे.
– आल्हाद गोडबोले