लागोपाठ दोन पराभवांमुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला असला तरी त्यांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता हार खाणार नाहीत. एरव्ही आपल्या समर्थकांच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या राणे यांनी या पराभवाची जबाबदारी मात्र स्वत:वर घेतली. यातूनच राणे यांना काँग्रेसशिवाय पर्याय नसून, काँग्रेसही त्यांच्या क्षमतेचा वापर करून घेण्याची शक्यता आहे. आता मागील दाराने म्हणजेच विधान परिषदेत प्रवेश करण्याचा राणे यांचा प्रयत्न असू शकतो.
लोकसभा निवडणुकीत मुलाचा, तर कुडाळ आणि वांद्रे पूर्वमध्ये स्वत: राणे यांचा अशा रीतीने राणे कुटुंबीयांच्या पराभवाची हॅट्ट्रिक पूर्ण झाली. मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या नेत्याचा लागोपाठ दुसरा पराभव होणे हा मोठा राजकीय धक्काच आहे. दोन पराभवांमुळे राणे राजकारणात मागे फेकले गेले आहेत. लागोपाठ दोन पराभवांमुळे राणे यांची उपयुक्तता कमी झाली असली तरी त्यांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता राणे माघार घेणार नाहीत. पण राणे यांनी तोंड उघडल्यास जनतेने नाकारलेल्या राणे यांनी आम्हाला शिकवू नये, असेच प्रत्युत्तर समोरच्या नेत्याकडून दिले जाईल. त्यातून राणे यांची कोंडी होऊ शकते.
लोकसभा पराभवानंतर राणे अन्य पर्यायाच्या शोधात होते. शिवसेनेची परतीची दारे केव्हाच बंद झाली आहेत. राष्ट्रवादीत मुक्त वाव मिळणार नाही. भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. दोन पराभवांमुळे कोणताही पक्ष राणे यांच्यासाठी पायघडय़ा पसरणार नाही. परिणामी, काँग्रेसमध्ये राहूनच राणे यांना अस्तित्वाची लढाई करावी लागणार आहे. राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सरकारच्या विरोधात लढण्यासाठी पक्षाला फायदा होऊ शकतो. ‘पराभवामुळे राणे यांच्यावर परिणाम होणार नाही. राणे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, भविष्यातही पक्षाचे नेतृत्व करीत राहतील,’ ही प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये राणे यांच्या कोकणातील बहुतांशी निकटवर्तीयांनी त्यांची साथ सोडली. दोन मुलांमुळे राणे अनेकदा अडचणीत आले. जनतेपासून राणे दूर गेल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली. सिंधुदुर्गमध्ये पराभव झाला. शिवसेना नेतृत्वाशी मतभेद झाल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला अंगावर घेतले. राज्यातील पक्षाच्या नेत्यांशी दोन हात केले. या पाश्र्वभूमीवर राणे यांना आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालून सर्वाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षाने संधी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा असू शकते, असे काँग्रेसमध्ये बोलले जाते.