News Flash

‘भाईजान’ या सांकेतिक नावाने सूत्रधाराचा आरोपींशी संवाद

राज्य दहशतवादविरोधी पथकाने स्फोटके, शस्त्रसाठा प्रकरणात नालासोपारा येथून वैभव राऊतसह शरद कळसकर याला अटक केली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| जयेश शिरसाट

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठीची तयारी सुरू असताना डॉ. विरेंद्र तावडे अन्य आरोपींसोबत ‘भाईजान’ या सांकेतिक नावाने संवाद साधत होता. कटात सहभागी असलेल्या अन्य आरोपींनाही अशीच सांकेतिक नावे देण्यात आली होती. तसेच हे आरोपी सातत्याने डॉ. तावडेसोबत मोबाईलवरून संपर्कात होते, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाच्या चौकशीतून पुढे आली आहे.

राज्य दहशतवादविरोधी पथकाने स्फोटके, शस्त्रसाठा प्रकरणात नालासोपारा येथून वैभव राऊतसह शरद कळसकर याला अटक केली. कळसकरने चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकर हत्येत सचिन अंदुरेसह प्रत्यक्ष सहभाग घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार एटीएसने अंदुरेला ताब्यात घेत सीबीआयच्या हवाली केले. सीबीआयने अंदुरेला डॉ. दाभोलकर प्रकरणात अटक केली. सीबीआयने केलेल्या चौकशीतून कळसकर आणि अंदुरे यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती पुढे आली. पुढील चौकशीत अंदुरेला डॉ. दाभोलकर हत्येच्या संपूर्ण कटाची संपूर्ण कल्पना होती. डॉ. दाभोलकर यांची हत्या का, कशी, कुठे, कधी करायची याची इत्यंभूत माहिती अंदुरेला होती. मात्र कळसकर हा फक्त अंदुरेसोबत औरंगाबादहून पुण्याला आला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्याला बऱ्याच गोष्टी समजल्या, अशी माहिती सीबीआयच्या चौकशीतून पुढे आल्याचे समजते.

पहिल्यापासून डॉ. दाभोलकर यांच्याह हत्याकटात सहभागी असलेला अंदुरे डॉ. तावडेला भाईजान संबोधित असे. भाईजान हे तावडेचे सांकेतिक नाव होते. हे नाव फक्त अंदुरे आणि तावडे यांच्यातील संवादासाठी मर्यादीत होते. अन्य आरोपी तावडेला आगाऊ पुरवलेल्या सांकेतिक नावांनी संबोधत. महत्वाचे म्हणजे तावडे आणि आरोपींमधील संवादात सांकेतिक भाषा, शब्दांचा वापर होता. कारखाना(शस्त्रागार), साहित्य(शस्त्र), राक्षस(लक्ष्य) असे काही सांकेतिक शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेण्यात सीबीआयला यश आले होते. सध्या अंदुरेच्या चौकशीतून पुढे आलेल्या भाईजानसह अन्य सांकेतिक शब्दांचा अर्थ समजून घेण्याची धडपड सीबीआय करत आहे.

अंदुरेच्या अटकेनंतर पुणे न्यायालयात सीबीआयने तावडे डॉ. दाभोलकर हत्येचा सूत्रधार असल्याची माहिती दिली होती. जून २०१६मध्ये सीबीआयने तावडेला सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून अटक केली. तावडे हिंदु जनजागृती समीतीचा पदाधिकारी होता, असे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले होते.

सीबीआयची दिशाभूल

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डॉ. विरेंद्र तावडेने चौकशीत अंदुरे, कळसकर यांची नावे का घेतली नाहीत याबाबत सध्या तपास सुरू आहे. तावडेने चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकर यांच्यावर सारंग आकोलकर, विनय पवार यांनी गोळ्या झाडल्याची माहिती पुढे केली. हे दोघे २००९च्या मडगाव स्फोटातील फरार आरोपी आहेत. तावडेला अटक होईपर्यंत या दोघांना देशातील कोणतीही तपास यंत्रणा शोधू शकली नव्हती. त्यामुळे मूळ आरोपींऐवजी तावडेने या दोघांची नावे पुढे केली असावीत. दुसरा संशय असा की कळसकर, अंदुरे यांना अटक घडली असती तर भविष्यातील कटाची अमलबजावणीला खीळ बसली असती किंवा डॉ. दाभोलकर हत्येच्या कटात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्वच आरोपींपर्यंत तपास यंत्रणा पोहचू शकल्या असत्या. चित्र स्पष्ट करण्यासाठी सीबीआय लवकरच कळसकर याचा ताबा एटीएसकडून घेऊ शकेल.

ध्यान, मंत्रपठणाचा चौकशीत अडथळा?

एटीएस आणि सीबीआयने अटक केलेल्या आरोपींची ध्यानसाधना, मंत्रोच्चाराने चौकशीत अडथळा येत असल्याची माहिती मिळते. डॉ. तावडेनेही याचाच उपयोग करत अनेकदा सीबीआयच्या चौकशी व तपासात अडथळे निर्माण केले होते, असे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:31 am

Web Title: narendra dabholkar murder case 3
Next Stories
1 प्रणव मुखर्जींनंतर रतन टाटा संघाच्या कार्यक्रमात झाले सहभागी
2 ताडदेव पोलीस वसाहतीत घरातील प्लास्टर कोसळून दोन जण जखमी
3 लैंगिक विकृती भोवली; आतमध्ये अडकला होता जेट स्प्रे
Just Now!
X