News Flash

पनवेल, पुण्यात सीबीआयचे छापे

डॉ. तावडे आणि अकोलकर यांचे ‘सनातन संस्थे’शी घनिष्ट संबंध असल्याचे कळते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी ‘सनातन’ तपासात पुढचे पाऊल
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) बुधवारी पनवेल येथे राहणारे डॉ. विरेंदर सिंह तावडे आणि पुणे येथे राहणारे सारंग अकोलकर यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे हस्तगत केली असून त्यांना काही भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेलही मिळाले आहेत.
डॉ. तावडे आणि अकोलकर यांचे ‘सनातन संस्थे’शी घनिष्ट संबंध असल्याचे कळते. अकोलकर हा मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या स्फोटांमधील संशयित असून त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे. तो फरारी म्हणून घोषित आहे. पुण्यात शनिवार पेठ परिसरातील त्याच्या घरावर छापा पडला आहे.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. ९ मे २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे ‘सनातन संस्थे’ सारख्या हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप सातत्याने डॉ. दाभोलकर आणि इतर कार्यकर्त्यांकडून होत होता. २०१४ साली गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटक झालेल्या ‘सनातन’च्याच समीर गायकवाड या साधकाच्या चौकशीतूनही डॉ. दाभोलकर हत्येविषयी काही धागेदोरे मिळतात का, याची छाननी ‘सीबीआय’ कडून सुरू होती.

‘आप’च्या ट्विपण्ण्या
बुधवारी सकाळी ‘सीबीआय’ने छापे सुरू करताच पत्रकार व ‘आप’ कार्यकर्ते आशिष खेतान यांनी ‘सीबीआय’ने हत्येची उकल केल्याचा दावा ‘ट्विटर’ वरून केला. सनातन आणि हिंदू जनजागरण समितीने ही हत्या घडवून आणली असून हल्लेखोरांची ओळखही पटल्याचे त्यांनी जाहीर करून टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 2:20 am

Web Title: narendra dabholkar murder case nias accused is now on cbi radar
टॅग : Cbi,Narendra Dabholkar
Next Stories
1 Eknath Khadse: एकनाथ खडसेंबाबत अहवाल श्रेष्ठींकडे!
2 पावसाची चाहूल!
3 छेडानगर जंक्शनवरील वाहतूककोंडीतून लवकरच सुटका
Just Now!
X