मुंबई : प्रसिद्ध समाज सुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातही कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्य़ातील पूरस्थितीमुळे अडथळा आला आहे. दाभोलकर यांची हत्या करण्यात आलेल्या पिस्तुलाची शोधमोहीम ठाणे खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने सुरू करण्यात आलेली नाही, तर पानसरे हत्येचा तपास करणारा अधिकारी कोल्हापूर येथील पुरामुळे मुंबईत येऊ शकला नाही आणि तपासाच्या प्रगतीचा अहवाल देऊ शकला नाही.

दोन्ही तपासांबाबत सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह आणि राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितल्यावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी तहकूब करत ती १६ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाची ठाणे खाडीत विल्हेवाट लावल्याची माहिती यंत्रणेला मिळाली. त्यानुसार शोधमोहिमेसाठी परदेशी पाणबुडय़ांची मदत घेण्यात येणार आहे. मात्र मुसळधार पावसामुळे  खाडीतील पाण्याची पातळी वाढली असल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आलेली नाही, असे न्यायालयास सांगण्यात आले.