डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्युनंतर प्रतिक्रीया देणे सोपे असले तरी त्यांचे विचार अंगिकारणे मात्र सोपे नाही. समाजाचा गाभा बदलाण्यासाठी विवेकाच्या वाटेने जाण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्यामुळे आता त्यांच्या वाटेवरून पुढे गेलो तर तरच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां पुष्पा भावे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार निर्धार सभेत बोलताना केले.
ठाण्यातील पाचवे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन समिती, परिवर्तन संस्था, संघटनांच्या वतीने शनिवारी सायंकाळी सरस्वती क्रीडा संकुलामध्ये नरेंद्र दाभोळकर विचार निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंधश्रध्दा निर्मूलन समिती ठाणे शाखेच्या अध्यक्षा वंदना शिंदे अध्यक्षस्थानी होत्या यावेळी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, अ‍ॅड. त्रिबंक कोचेवाड उपस्थित होते.
भावे पुढे म्हणाल्या की, डॉ. दाभोलकरांचे कार्य, त्यांची देह बोली कार्यकर्त्यांच्या मनात चैतन्य निर्माण करणारी होती त्यामुळेच त्यांचा खून होतो यावर विश्वास बसत नाही. अंधश्रध्देतुन होणाऱ्या शोषणास त्यांनी विरोध केला. माणसाला भिती वाटली की विवेकाचा आधार सुटतो. त्यांनी आगरकरांचांच्या विवेकवादाचा पुरस्कार केला आणि ही परंपरा ते पुढे नेत होते असे भावे यांनी  सांगितले.