पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे (आर्टिफिशयल इंटेलिजन्स) मनुष्यबळ निर्थक ठरेल असा बागुलबुवा केला जात आहे. खरेतर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी क्षमतांचा, कौशल्यांचा विकास होणार असून त्यामुळे देशातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत केले.

महाराष्ट्र सरकार, मुंबई विद्यापीठ आणि वाधवानी बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘वाधवानी इन्स्टिटय़ूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र) या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे आदी उपस्थित होते.

खाजगी आणि सावर्जनिक क्षेत्राच्या एकत्रिकरणातून एक चांगली गोष्ट घडू शकते याचे हे केंद्र एक उत्तम उदाहरण आहे. भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात जलद गतीने प्रगत होत आहे. एकीकडे शेतीपासून ते विमानशास्रापर्यत सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, तर दुसरीकडे छोटय़ा उद्य्ोजकांपासून ते मोठय़ा उद्योजकांपर्यत सगळेच औद्योगिक क्षेत्रांत उतरत आहेत. या वातावरणातूनच भारताच्या प्रगतीपथाचा मार्ग उंचावत असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम हा भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, तंत्रक्रांतीच्या काळापासून मनुष्य आणि यंत्र हा वाद असला तरी प्रत्येक वेळेस मानवच हा शक्तीशाली ठरत आला आहे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केले.

विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र

मुंबई विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागामार्फत हे केंद्र चालविले जाणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील जगभरातील दहा संशोधक सध्या संस्थेसोबत काम करणार आहे. या केंद्रामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून डेटा सायन्स या विषयातील संशोधन पद्धतीचा समावेश केला जाणार आहे.