पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२५ पर्यंत महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फडणवीस सरकारचे लोकाभिमुख प्रशासन, उद्योगस्नेही धोरणे यांच्या आधारे ते उद्दिष्ट नक्कीच साध्य करता येईल आणि महाराष्ट्र हे एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८’ या गुंतवणूकदारांच्या परिषदेत व्यक्त केला.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ या गुंतवणूकदारांच्या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा, रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, महिंद्र समूहाचे आनंद महिंद्र, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, गोदरेज समूहाचे आदि गोदरेज, व्हर्जिन समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन, वेदांत समूहाचे अनिल अगरवाल आदी देश-विदेशातील नामांकित उद्योजक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’साठी उद्योगस्नेही उपाययोजना केल्या. नियम-प्रशासकीय प्रक्रियेत सुधारणा केल्या. कारभारात कार्यक्षमतेला वाव देणारी कार्यसंस्कृती आणली. त्याचा उपयोग वातावरण बदलण्यास झाला आहे. २०१६-१७ मध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीपैकी ५१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली. दोन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया परिषदेतील सामंजस्य करारांपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक ही प्रत्यक्षात आलेली आहे. आता फडणवीस यांनी २०२५ पर्यंत महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत कोणतेही लक्ष्य कठीण नाही. महाराष्ट्र नक्कीच ते उद्दिष्ट साध्य करेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या अर्थकारणाला मोठी चालना देणारा प्रकल्प ठरेल, असे मोदी म्हणाले. गेल्या चार वर्षांत आम्ही अनेक जुनाट कायदे रद्द केल्याचे नमूद करत मोदी यांनी केंद्र सरकार करत असलेल्या कामांचा-सुधारणांचा आढावा घेतला. नवीन कायदे करताना सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप व सरकारवरील कमीत कमी अवलंबित्व हे तत्त्व ठेवले आहे, असेही मोदी म्हणाले.

समर्थ व संपन्न महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी होणऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्राला माझ्या शुभेच्छा अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. जो केंद्राच्या जवळ असतो त्याचे चुंबकीय तत्त्व अधिक प्रभावी असते, असे विधान करत पंतप्रधान मोदी यांनी फडणवीस व महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारच्या जवळचे असल्याने अधिक प्रभावी आहेत, असे सूचित केले.