|| संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेतील अविश्वास ठरावावरील चच्रेच्या उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. विरोधी पक्षाच्या एकीकरणात पवार यांनी पुढाकार घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसमध्ये पवारांबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी यांनी पद्धतशीरपणे केला आहे.

लोकसभेतील चच्रेत भाग घेताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आपल्या नजरेला नजरही भिडवू शकत नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना मोदी यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या नजरेत नजर भिडवणाऱ्या नेत्यांचे काय झाले याची उदाहरणे दिली.

नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, प्रणब मुखर्जी या नेत्यांची नावे घेतल्यावर ‘हमारे’ शरद पवार, असा उल्लेख केला. मोदी यांनी आमचे शरद पवार असे म्हटल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया साहजिकच उंचावल्या गेल्या.

मोदी आणि पवार यांच्यातील मत्री सर्वश्रुत आहे. मागे बारामती दौऱ्यात मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी कशी मदत केली होती याची आठवण सांगताना पवारांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकविले, असेही सांगितले होते. राज्य विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबाही देऊ केला होता. यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादीच्या संबंधाबद्दल नेहमीच चर्चा असते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू आदींनी मान्य नाही. अशा वेळी शरद पवार हे विरोधकांची एकी करू शकतात. तसे पवारांनी मागे सूचितही केले होते. लोकसभेतील अविश्वास ठरावावरील चच्रेत सहभागी होताना राष्ट्रवादीचे तारिक अन्वर यांनी भाजप सरकारवर टीकाही केली होती.

विरोधी गोटात किंवा काँग्रेसमध्ये पवारांबद्दल संशय व्यक्त करण्याकरिताच मोदी यांनी पवारांचे कौतुक केल्याचे बोलले जाते. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास भाजपसाठी कडवे आव्हान असेल. पवारांबद्दल काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करणे किंवा अन्य नेत्यांची काय गत झाली याची पवारांना आठवण करून देण्याचा मोदी यांचा प्रयत्न असावा, अशी प्रतिक्रिया एका नेत्याने व्यक्त केली.

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना मोदी उत्तरे देऊ शकले नाहीत. म्हणूनच जुने उगळून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातूनच त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख केला असावा.   – रणदीपसिंग सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi sharad pawar
First published on: 22-07-2018 at 01:34 IST