17 September 2019

News Flash

नवउद्यमींसाठी नोव्हेंबर महिना चलनतापाचा!

नोटाबंदीमुळे वर्षांतील सर्वात कमी गुंतवणुकीची नोंद

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नोटाबंदीमुळे वर्षांतील सर्वात कमी गुंतवणुकीची नोंद

देशात नवउद्योगाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ या वर्षांची सुरुवात ‘स्टार्टअप इंडिया’च्या घोषणेने केली. त्यानंतर नवउद्योगांतील गुंतवणुकीत वाढ झाली. परंतु नोव्हेंबर महिन्यातील निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर सामान्यांना जसा तो महिना काटकसरीत काढावा लागला तसाच अनुभव नवउद्योगांनाही आला. या महिन्यात नवउद्योगांत वर्षभरातील सर्वात कमी गुंतवणूक झाल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

निश्चलनीकरणामुळे नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण बाजारातील मागणी मोठय़ा प्रमाणावर कमी झाली. ग्राहककेंद्री उद्योगांच्या व्यवहारांतही त्याचे प्रतिबिंब उमटले. हा व्यवसाय नजीकच्या काळात नेमका किती फायदा मिळवू शकेल याचा अंदाज बांधणे गुंतवणूकदारांना अवघड झाले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६७ टक्के कमी गुंतवणूक झाल्याचे ‘इन्स४२’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी गुंतवणूक कमी झाल्याचे अहवालात नमूद आहे. प्राथमिक गुंतवणुकीच्या व्यवहारांमध्ये ७० टक्क्यांनी कपात झाली असून गुंतवणुकीच्या किमतीत तब्बल ९३ टक्क्यांनी कपात झाल्याचे अहवाल म्हणतो. त्याचबरोबर अंतिम टप्प्यातील गुंतवणुकीमध्ये ७६ टक्क्यांनी कपात झाली. संकल्पनांची नक्कल करणाऱ्या कंपन्यांमधून फारसा परतावा येत नाही हे गुंतवणूकदारांच्या लक्षात येण्यास सुरुवात झाल्याने अशा कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाली असे, ‘कॅटापूल्ड’चे सतीश कटारिया यांनी सांगितले.

कंपन्यांकडून व्यवसायाचे नव्याने आराखडे

अनेक कंपन्या आपल्या व्यवसायाचा आराखडा नव्याने तयार करू लागल्या आहेत. यामुळे सध्याचा कालावधी हा दुरुस्तीचा कालावधी मानला जात आहे. हा कालावधी आणखी तीन ते चार महिने कायम राहणार असून त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात नवउद्योगांमध्ये गुंतवणूक होण्यास सुरुवात होईल असे कटारिया म्हणाले. तर फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाल्याने बाजारात काही प्रमाणात अस्थिरता आहे. ही अस्थिरता जागतिक बाजारातही जाणवत असल्याचे अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी नमूद केले. यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. याचबरोबर थेट ग्राहकांना सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण कमी झाले असून व्यवसायाला उपयुक्त ठरणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक होत असल्याचे निरीक्षणही घैसास यांनी नोंदविले.

First Published on January 15, 2017 1:25 am

Web Title: narendra modi startup india