भारत-चीन युद्धानंतर सीमेवरती तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो..’चे सूर लतादीदींनी महालक्ष्मी रेसकोर्सवर सोमवारी पुन्हा एकदा आळविले आणि त्यात हजारो रसिकांनी आपले सूर मिसळले. या देशभक्तीपर गीताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उमटले, तर उपस्थित मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
महालक्ष्मी रेसकोर्सवर लोढा फाऊंडेशन आणि शहीद गौरव समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लतादीदींच्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गीत गाणार असल्यामुळे रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. दिल्लीमध्ये मी जेव्हा हे गाणे गाण्यासाठी गेले होते तेव्हा भारत-चीन युद्धामुळे पं. नेहरू अत्यंत विमनस्क मन:स्थितीत होते.  हे गाणे इतके लोकप्रिय होईल, असे तेव्हा वाटले नव्हते. पण सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी प्रेरणादायक ठरलेल्या या गीताच्या ओळी तुमच्यासाठी गाते, असे दीदींनी सांगताच वातावरणात एकदम शांतता पसरली. ‘माझ्याबरोबर तुम्हीही गा’, अशी रसिकांना साद घालत ५० वर्षांपूर्वी आळवलेले ‘ए मेरे वतन के लोगो’चे सूर जुळविले आणि तमाम रसिकांनी त्यात आपले सूर मिसळले.
कवी प्रदीप यांनी लिहिलेले, सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले  हे अजरामर गीत लतादीदींनी भारत-चीन युद्धानंतर सादर केले, तेव्हा पं. नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आले होते. ही ऐतिहासिक घटना अनेकांना माहीत आहे. पण केवळ पं. नेहरूंच नव्हे तर सीमेवर डोंगरकपारीत तैनात असलेल्या प्रत्येक सैनिकाचे डोळे पाणावले होते, असे सांगत जनरल वेदप्रकाश मलिक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या युद्धात भारताचे सुमारे तीन हजार सैनिक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. या परिस्थितीत छोटय़ाशा ट्रान्झिस्टरवरुन ऐकलेल्या दीदींच्या सुरांनी आम्हाला मोठे बळ दिले होते. हे गाणे संपूर्ण देशबांधव आणि आमच्यासारखे सैनिकांना जोडणारा दुवा ठरले. दीदींच्या सुरांनी या गाण्याला आत्मा दिला. त्यामुळे पुढची कित्येक वर्षे हे गाणे स्फूर्तीदायक ठरेल, असे मलिक यांनी सांगितले.