आशीष शेलार यांची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेनेने केलेली स्तुती ही स्वार्थ साधण्यासाठी आहे की नि:स्वार्थ भावनेने, असा टोला लगावत पंतप्रधान मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अंतर निर्माण व्हावे यासाठी खासदार संजय राऊत रोज एकपात्री वगनाटय़ करताना सर्वानी पाहिले, असे टीकास्त्र भाजपचे नेते आशीष शेलार यांनी सोडले.

पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांच्यात दरी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत असल्याच्या शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर नेम साधला होता. तसेच मोदी यांच्याबद्दल शिवसेनेला आदर असल्याचे विधानही केले होते. भाजपच्या संघटनात्मक बैठकीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना शेलार यांनी राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले. संजय राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असून त्यांनी वयासह परिपक्वव्हावे, असा टोलाही शेलार यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी नेम साधला. पूर्वी इतर पक्षांचे ज्येष्ठ नेते ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जायचे. आता काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवरून बाहेर जावे लागते, असे शेलार म्हणाले.