महम्मद थवर, मुंबई

मुंबई दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले हेमंत करकरे यांच्यावर टीका करताना प्रज्ञासिंह ठाकूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकरे यांच्याविषयीच्या भावनांचे विस्मरण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या टीकेचे भाजप वर्तुळातही पडसाद उमटले. २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तरीही ते तातडीने मुंबईत आले आणि शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची त्यांनी भेटही घेतली. या शहीदांना गुजरात सरकारतर्फे एक कोटी रुपयांचे साह्य़ त्यांनी जाहीर केले. करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी ते साह्य़ साभार नाकारले होते.मात्र करकरे यांच्या  प्राणार्पणाबद्दल युतीच्या नेत्यांची भावना आदराचीच होती. जोगेश्वरी आणि ठाणे येथे करकरे यांच्या नावाने उद्यानेही त्यातूनच साकारली. गेल्या वर्षी मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक्स्प्रेस वृत्तसमूहाने आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहीदांविषयी गौरवोद्गार काढले होते.