लोकसभा निवडणुकांचे निकाल आठवडाभराने येणार असले तरी भांडवली बाजाराने केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए -२७२’चा कौल पक्का मानून, शुक्रवारी इतिहासात प्रथमच २३ हजार हा जादूई आकडा पार केला. सेन्सेक्सने २३,०४८.४९ अंश हा ऐतिहासिक उच्चांक दाखविला.
दिवसअखेर सेन्सेक्स तब्बल ६५०.१९ अंश उसळला. त्याची ही चालू वर्षांतील सर्वात मोठी तर निवडणूकपूर्व तेजीच्या गेल्या सात महिन्यांच्या प्रवाहातील दुसरी मोठी झेप ठरली आहे.
नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानाचे उमेदवार असतील, ही घोषणा होताच तिला प्रतिसाद म्हणून १९ सप्टेंबर २०१३ रोजीच शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६८४ अंशांनी उसळला होता, त्यानंतर सात महिन्यांनी मतदानाच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार उरकताना सेन्सेक्सचा पारा चढलेला दिसला. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी सुमारे तीन टक्केवाढ दर्शविली.
भांडवली बाजाराने मोदी सरकारच्या बाजूनेच हा कौल दिला आहे हे निश्चित, असे बहुतांश विश्लेषकांचे म्हणणे आहे. ‘मोतीलाल सिक्युरिटीज’चे राहुल शहा यांच्या मते शुक्रवारच्या व्यवहारात आजवर तेजीपासून वंचित राहिलेल्या क्षेत्रांचे भावही वधारलेले दिसून आले.
विशेषत: बँक, वित्त क्षेत्राचे निर्देशांकाच्या उसळीत प्रमुख योगदान राहिले. आयसीआयसीआय बँक, येस बँक या खासगी बँकांच्या समभागांचे भाव ७ ते १० टक्क्यांनी वधारले.  सोमवारी मतदानोत्तर चाचण्या येतील आणि बाजाराच्या आशा खऱ्या ठरल्यास सध्या सुरू असलेल्या तेजीला आणखी बळ मिळेल, असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.