‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात मराठी चित्रपटकर्मींना नसीरूद्दीन शहांचे आवाहन

उमेश कुलकर्णी, ‘कोर्ट’चा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे किंवा ‘फँ ड्री’चा नागराज मंजुळेंसारखे तरुण मराठी चित्रपटकर्मी निश्चितपणे आशयघन चित्रपट देत प्रेक्षकांची अभिरूची बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, अशाच हुशार चित्रपटकर्मीवर बॉलीवुड नजर ठेवून असते. एखाद्याने यशस्वी चित्रपट बनवायचा अवकाश की बॉलीवुड त्यांच्यावर आपले जाळे फे कते. मग, हे तरुण नकळत तडजोडी करायला लागतात. अनेक हुशार मराठी चित्रपटकर्मींना परिस्थितीला शरण जाताना मी पाहिलेले आहे, अशी मनापासून काळजी व्यक्त करतानाच त्यांना या जाळ्यात फसू नका, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शहा यांनी केले.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

अभिनयाचे चालतीबोलते विद्यापीठ असलेल्या नसीरु द्दीन शहा नामक अवलियासोबतची ‘लोकसत्ता गप्पां’ची मैफल समांतर ते व्यावसायिक चित्रपट या स्थित्यंतराचा एक काळ जिवंत होईल, ही रसिकांची साहजिक अपेक्षा होतीच. पण रंगभूमी आणि चित्रपट माध्यमातून कलाकार म्हणून स्वत:ची अनवट वाट निवडून पुढे आलेल्या या अभिनेत्याने एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीबरोबर मराठी चित्रपट, दिग्दर्शक यांच्याबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, कौतुकाचे बोल आणि त्याजोडीने मांडलेली सडेतोड मते या सगळ्याचे कोलाज साधत रविवारी सकाळी रंगलेली ही गप्पांची मैफल एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली. ‘लोकसत्ता’ आयोजित, ‘केसरी’ सहप्रायोजित आणि ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ बँकिंग पार्टनर असलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’चे हे पाचवे पर्व नसीरुद्दीन शहा या उत्कट, अभिजात आणि सच्च्या मनाच्या कलाकाराच्या अनुभवी बोलांनी समृध्द झाले. ज्या तरुण मराठी दिग्दर्शकांचे कौतुक नसीरुद्दीन शहा यांनी केले त्याच पिढीचा प्रतिनिधी असलेल्या दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी नसीरुद्दीन शहांना आजच्या गप्पांच्या कार्यक्रमातून बोलते केले. हिंदी चित्रपट अभिनेता म्हणून नसीरु द्दीन शहा यांची कारकिर्द मोठी असली तरी कलाकार म्हणून त्यांची झालेली जडणघडण ही ‘एनएसडी’सारख्या संस्थेतून झालेली असल्याने सुरूवातीपासूनच रंगभूमीशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती. अर्थात, त्यांच्या या अभिनय प्रवासाने जेफ्री केंडल, अल्काझी ते सत्यदेव दुबे हे नाटय़ाविष्काराचे वेगवेगळे प्रवाह अनुभवले होते, अभ्यासले होते. त्याचा उल्लेख त्यांनी गप्पांमधून केलाच मात्र या प्रत्येकाचा आपल्यावर नेमका कसा परिणाम झाला आणि त्यांच्याकडून बाळकडू घेऊनही स्वत: नट म्हणून प्रत्येक टप्प्यावर कशी वाटचाल केली हेही त्यांनी सविस्तर अनुभवातून विशद केले.

समांतर चित्रपटांमधून, नाटकांमधून आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावलेल्या या अभिनेत्याने बॉलीवुडमध्येही विचारपूर्वक आपल्या तत्वांना ठाम राहत चित्रपटांची निवड केली. आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे वाटचाल करताना इंडस्ट्रीच्या आर्थिक समीकरणांचा दबाव कलाकार, दिग्दर्शकांवर येतोच. बॉलीवुडमध्ये गेली अनेक वर्ष काहीही बदल झालेला नाही. तिथे पैशासाठीच चित्रपट बनवले जात होते, आजही शंभर कोटीच्या आकडय़ासाठी चित्रपट केले जातात, अशी टीका त्यांनी केली. मात्र चांगल्या चित्रपटकर्मीनाही या आर्थिक गणितात अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न थांबलेला नाही. त्यांचा हा दबाव सहन करता सचोटीने टिकून राहणे ही आजच्या चित्रपटकर्मीसाठी सोपी गोष्ट नाही, पण त्यांनी याही परिस्थितीत आपली कलात्मकता जपायला हवी, असे आग्रही मत त्यांनी मांडले. आपल्या पिढीपेक्षा आत्ताच्या पिढीतील कलाकार, दिग्दर्शकांवर आपल्याला जास्त विश्वास आहे हे सांगताना त्यांनी राजकुमार राव, नवाजुद्दीन, अलिया सारख्या कलाकारांच्या बरोबरीने अभिनेत्री अमृता सुभाषचेही नाव घेतले. मराठी चित्रपटांमध्ये घडून आलेली क्रांती ही आनंद साजरा करण्याजोगीच आहे. एकेकाळी मराठी चित्रपट दादा कोंडकेंच्या चित्रपटांबरोबर संपणार अशी भीती आपल्याला वाटत होती पण त्याच मराठीत हा बदल घडला याबद्दल आश्चर्य वाटत नाही. कारण भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढच मराठी माणसाने केली. श्याम बेनेगल, ख्वाजा अहमद अब्बाससारख्या दिग्दर्शकांचे आशयघन चित्रपटांच्या कैक वर्ष आधी व्ही. शांताराम यांनी गंभीर मराठी चित्रपट हाताळले होते, अशा शब्दांत त्यांनी मराठी चित्रपट आणि मराठी दिग्दर्शक-कलाकार कायमच सरस होते हे ठामपणे सांगितले.

आपला अभिनयाचा प्रवास हा पडद्यावर जे कलाकार सच्चे वाटले त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुरू झाला. अभिनय आणि दैनंदिन आयुष्यातह हा सच्चेपणा जपण्याचा आग्रह धरणाऱ्या नसीरूद्दीन शहा यांनी या गप्पांचा समारोप करतानाही ‘द रोड नॉट टेकन’ या इंग्रजी कवितेचा आधार घेत आपण स्वत: अनवट वाट निवडून पुढे जात राहिलो आणि म्हणूनच वेगळे ठरलो हे पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक नमूद केले.