भविष्यात शहरांचं नियोजन कसं करावं,  असा प्रश्न एमएमआरडीएचे माजी नियोजन तज्ज्ञ विद्याधर फाटक यांना लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या कार्यक्रमात विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं. तसंच महानगर म्हणजे फक्त मुंबई, पुणे आणि नागपूर नाही तर येत्या काळात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव ही देखील महागनरं होतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

”महाराष्ट्रात महानगर म्हटलं की फक्त मुंबई, पुणे आणि नागपूर यांचाच विचार केला जातो. मात्र आगामी काळात नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव ही देखील येत्या काळातली महानगरं आहेत. या शहरांचा विकास होतो आहे. भविष्यात राज्यातल्या जीडीपीचा बहुतांश वाटा ही शहरं उचलतील” असं मत MMRDA चे माजी नियोजन तज्ज्ञ विद्याधर फाटक यांनी व्यक्त केलं. लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या कार्यक्रमात शहर नियोजन या विषयावर फाटक यांनी त्यांचे विचार मांडले. ”महानगरं ही राज्याचा विकासात मोठा हातभार लावत असतात. पायाभूत सोयी सुविधांचे दोन प्रकार असतात. एक प्रकार असतो तो राष्ट्रीय स्तरावरच्या पायाभूत सुविधा ज्यामध्ये विमानतळ, पोर्ट, हायवे या गोष्टी येतात. तर दुसऱ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा या महानगर स्तरावरच्या असतात.” आपल्या देशाच्या एकूण जीडीपीपैकी ६० ते ७० टक्के वाटा महानगरं उचलतात असंही त्यांनी म्हटलं आहे.

”आगामी काळात नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर ही शहरं तसेच समृद्धी महामार्गामुळे विदर्भातली काही शहरंही महानगरं होण्याची शक्यता आहे.” या शहरांचा विकास होणं आणि या शहरांमधल्या पायाभूत सोयी सुविधा वाढणं आगामी काळात गरजेचं आहे असंही फाटक यांनी म्हटलं आहे. शहरांची वाढ आणि पायाभूत सोयी सुविधा या एकमेकांना पूरक असलेल्या गोष्टी आहेत. राहणीमानाचा दर्जा हा शहरांचा विकास आणि पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा ठरतो. राहणीमान उंचावलं की आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते. आर्थिक प्रगती साधत असताना आपण पायाभूत सुविधांची साधनं कशी उभी करु? याचाही विचार होण्याची गरज असल्याचंही विद्याधर फाटक यांनी बोलून दाखवलं.

बऱ्याच शहरांमध्ये सध्या मेट्रोची कामं सुरु आहेत. या मेट्रो स्थानकांजवळही अनेक समस्या आहेत, त्या सोडवल्या जाणं आणि त्यावर विचार होणं गरजेचं आहे. मेट्रो आल्यानंतर थोड्या काळात अनेक माणसं मेट्रो स्थानकाजवळ येणार आणि जाणार असतील. तर रिटेल डेव्हलेमेंट होऊ शकते, प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंट होऊ शकते असंही मत फाटक यांनी मांडलं. यासाठीचं नियोजन होणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत शहरीकरणाची व्याख्या ही होती की एखाद्या योजनेतून प्रकल्प तयार होतात. आता स्थिती काहीशी उलट आहे प्रकल्प मोठे झाले आहेत. या प्रकल्पांना प्रतिसाद देणारं नियोजन कसं करायचं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मेट्रो हे यासाठीचं महत्त्वाचं उदाहरण आहे असंही फाटक यांनी म्हटलं आहे. शहरांचं नियोजन किंवा महानगरांचं नियोजन करताना शहरांचा विस्तार कसा होणार? तसेच हा विस्तार करताना पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणार? या दोन्ही प्रश्नांचा विचार होणं गरजेचं आहे असंही फाटक यांनी स्पष्ट केलं.