नाशिक, पुण्याहून मुंबईत येणाऱ्या नोकरदार वर्गाची मागणी

मुंबई : पुणे, नाशिक येथून मुंबईमध्ये दररोज प्रवास करून कामाला येणाऱ्या नोकरदार वर्गाला टाळेबंदीचा फटका सहन करावा लागत आहे. सार्वजनिक वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी गाडय़ांचा आधार घ्यावा लागत आहे. वैयक्तिक वाहनावरील पेट्रोल-डिझेलसाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे, तर खासगी वाहने अवाच्या सव्वा भाडे आकारत आहेत.

टाळेबंदीमुळे जिल्ह्याअंतर्गत प्रवासासाठी एसटी आणि रेल्वे सुविधाही बंद आहेत. याचा फटका पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या शेकडो नोकरदार वर्गाला बसत आहे. यातील बहुतांश चाकरमानी मंत्रालय, पालिकेच्या सेवेतील कर्मचारी आहेत. तर काही जण खासगी आस्थापनांतील आहेत. सद्य:स्थितीत एसटी आणि रेल्वे सेवा बंद आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही जण   पावसाळी वातावरण असताना धोका पत्करून दुचाकी वाहनावरून पुणे ते मुंबई असा प्रवास करून कामावर येत आहेत. खासगी गाडीने नवी मुंबईत येऊन तेथून बसने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे अथवा एसटी बस सुरू करावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.

मीनाक्षी बिराजदार या पुण्यातून मालाड येथील महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयात कामाला येतात. रेल्वे सेवा बंद असल्याने सध्या त्यांना स्वत:च्या गाडीने कामावर यावे लागत आहे. मात्र दरदिवशीचे पेट्रोल, खासगी ड्रायव्हर, टोल भाडे यांचा सुमारे चार ते साडेचार हजार रुपयांचा खर्च त्यांना करावा लागत आहे. दर आठवडय़ाला किमान ८ ते १२ हजार रुपयांपर्यंतचा खर्च फक्त प्रवासावर होत असल्याचे त्या सांगतात.

‘सीएसटीला राज्य मराठी विकास संस्थेत कामाला आहे. सध्या आठवडय़ातून एकदा कामाला यावे लागते. त्यामुळे पुणे ते पनवेल असा दुचाकीने प्रवास करतो. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने दुचाकीचा प्रवास करून कामावर येण्याशिवाय पर्याय नाही. घरी परतताना रात्री प्रवास करावा लागतो. एकदा भरपावसात पनवेल ते पुणे असा दुचाकी  प्रवास करावा लागला,’ अशी माहिती दीपक कांबळे यांनी दिली.