गेली पाच वर्षे राज्यभरातील तरुणाईच्या नाटय़गुणांना आव्हान देत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या महाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला दरवर्षी नाटय़पंढरीतील दिग्गज कलावंतांच्या प्रतिभेचा परिसस्पर्श लाभला आहे. यंदाचे वर्षही अपवाद नाही. रंगभूमीची प्रगल्भ जाण, प्रयोगशीलतेचे भान आणि विलक्षण प्रतिभा लाभलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गेली चाळीस वर्षे नाटक आणि समांतर चित्रपटाशी स्वत:ला घट्ट जोडून घेतलेले, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ किताबांनी गौरवण्यात आलेले नसिरुद्दीन शहा यांची ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरची उपस्थिती ही खास ठरणार आहे. ठोस विचार घेऊन कलाक्षेत्रात वावरणारा हा अवलिया कलाकार तरुणाईतही त्याच सहजतेने मिसळतो. केवळ कलाक्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजभान ठेवून वावरणारा हा कलावंत वेळोवेळी देशासमोर उभ्या राहिलेल्या नानाविध घटनांवर सडेतोड भाष्यही करताना दिसतो. त्यामुळेच त्यांचा अभिनय जसा आबालवृद्धांना भावतो तसेच त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक विचारांशी बांधिलकी आपल्याला थक्क करून जाते. अभिनयाच्या क्षेत्रातील मुशाफिरीबरोबरच एरव्हीच्या आयुष्यातही एक सर्जनशील व्यक्ती म्हणून अनुभवलेल्या अनेक भल्याबुऱ्या आठवणींचे संचित या प्रतिभावंताकडे आहे. हे बहुमोल विचारांचे संचित ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरील तरुणाईसमोर उलगडणार आहे.

‘स्पर्श’, ‘इजाजत’, ‘निशांत’, ‘मिर्च मसाला’सारख्या वास्तव विषयांची मांडणी करणाऱ्या चित्रपटांमधून नानाविध भूमिका केलेल्या या कलावंताने रंगभूमीवरही आपले वेगळेपण जपले. त्यांची चित्रपटातील कारकीर्द सुरू झाली त्याच वेळी ते रंगभूमीवरही सक्रिय झाले. सुरुवातीच्या काळात ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘ज्युलियस सीझर’, ‘अ वॉक इन द वुड्स’सारखी इंग्रजी नाटके केली. हिंदीत नवीन नाटककारांच्या संहिताच येत नसल्याने त्यांनी हिंदी साहित्यविश्वातील नामवंतांच्या कादंबरीवर आधारित नाटकांची निर्मिती केली. ‘इस्मत आपा के नाम’ असो वा ‘आईनस्टाईन’सारखे इंग्रजी नाटक, काहीएक विचार, जाणिवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम या उद्देशाने त्यांनी उत्तमोत्तम नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘मोटली’ या आपल्या नाटय़संस्थेच्या माध्यमातून नसिरुद्दीन शहा यांनी गेली चाळीस वर्षे आशयघन नाटय़निर्मिती सुरू ठेवली आहे. चित्रपटांमधून काम करतानाही रंगभूमीवर सातत्याने अभिनय करणे किती महत्त्वाचे आहे हे ओळखून स्वत: इंग्रजी-हिंदी नाटके घडवत राहिलेल्या नसिरुद्दीन शहा यांनी तरुण कलाकारांनाही घडवले आहे. रंगभूमीवरच्या त्यांच्या समृद्ध अनुभवविश्वात शिरण्याची संधी यानिमित्ताने तरुणाईला मिळणार आहे.

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत

लोकसत्ता लोकांकिका

सहप्रायोजक – मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय – आयओसीएल

सपोर्टेड बाय – अस्तित्व

टॅलेन्ट पार्टनर – आयरिस प्रॉडक्शन