राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणा-या मारेक-याचे उदात्तीकरण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नेते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे. नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना वैद्य यांनी आपले मत मांडले.
नथुराम गोडसे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती. त्यामुळे या मारेक-याचे उदात्तीकरण होता कामा नये, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. वैद्य यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही. पनवेलमध्ये महाराणा प्रताप बटालियन या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून विरोध केला.