‘नॅको’चे राज्य सरकारला आवाहन

संदीप आचार्य, मुंबई</strong>

अल्पवयीन मुलगा आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. किशोरवयीन मुलींमधील वाढते गर्भपात तसेच एड्सचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन महाराष्ट्राने तात्काळ ‘किशोरावस्था जीवन कौशल्य शिक्षणा’चा (लैंगिक शिक्षण) कार्यक्रम राबवावा, असे ‘राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थे’ने राज्याच्या मुख्य सचिवांना कळवले आहे. मुख्य सचिवांनीही याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.

भारतात १५ ते २९ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत २५ टक्के एवढी असून यातील ३.१ टक्के तरुणांना एचआयव्ही संसर्गाची लागण झाली आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे एड्सच्या संक्रमणाचे  १५ ते २४ वयोगटामधील तरुणांमधील प्रमाण मोठे असल्याने महाराष्ट्रात अग्रक्रमाने हा विषय शिकविण्यासाठी घेण्यात यावा असा ‘नॅको’चा आग्रह आहे.

किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हा विषय शिकविण्यावरून २००७ साली विधानसभेत हंगामा झाला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांना अखेर शैक्षणिक अभ्यासक्रमातून हा विषय रद्द करावा लागला. तेव्हापासून आजपर्यंत राज्यातील शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात हा विषय शिकविला जात नाही. राज्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात हा विषय शिकवला जात नसला तरी मुंबई महापालिकेच्या शाळेत हा विषय आजही अभ्यासक्रमात असून गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूसह छत्तीसगडसारख्या राज्यातही हा विषय अभ्यासक्रमात असल्याकडे ‘राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थे’चे (नॅको) अतिरिक्त सचिव व महासंचालक संजीव कुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कळवले आहे.

लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे देशाच्या या भावी पिढीसमोर आज एड्स- एचआयव्ही संसर्गाचा धोका सर्वाधिक असल्याचे ‘नॅको’चे म्हणणे आहे. किशोरवयातच लैंगिकदृष्टय़ा सक्रिय होणारी मुले हा या समस्येच्या दृष्टीने अतिजोखमीचा गट असतो. मादक द्रव्यांचे सेवन, बेरोजगारी व स्थलांतरांमुळे कुटुंबापासून अलग व एकटे राहणारा तरुण वर्ग हा असुरक्षित लैंगिक संबंधांची शिकार बनून एचआयव्ही संसर्गाच्या प्रभावाखाली लवकर येऊ शकतो. इंटरनेट व सोशल मीडियामुळे लैंगिकतेविषयीची विपरीत वा विकृत माहितीचा प्रसार झपाटय़ाने होत असून किशोरवयीन मुलांमध्ये त्याचा गैरवापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याची उदाहरणे समोर येत असल्याने या वयोगटातील मुलांना योग्य मार्गदर्शन व लैंगिक शिक्षण मिळणे अत्यावश्यक असल्याची ठाम भूमिका ‘नॅको’ घेतली आहे.

यासाठी ‘किशोरावस्था जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम’ राबविण्याची आवश्यकता असून ८ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक आहे. याबाबतचा अभ्यासक्रम हा शालेय एड्स शिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प व किशोरवयीन पुनरुत्पादक व लैंगिक आरोग्य कार्यक्रमावर तयार करण्यात आला आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षांत १६ तासांचा अभ्यासक्रम असून मुख्य सचिव दिनेश जैन यांनी आरोग्य विभागाला याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात या अभ्यासक्रमाचे स्वरूप नेमके कसे असावे यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. अन्य राज्यातील अभ्यासक्रम व मुंबई महापालिकेतील अभ्यासक्रमाचा विचार करता स्वच्छता व शारीरिक सुरक्षा यासह एड्सचा धोका यावर भर देऊन लैंगिक शिक्षण कशा प्रकारे देता येईल यावर काम सुरू आहे. शिक्षण विभागाचीही मदत घेतली जाणार आहे.

-डॉ. अनुप यादव, आयुक्त, सार्वजनिक आरोग्य