22 September 2020

News Flash

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी मुंबईत निधन झाले.

| October 1, 2013 02:33 am

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील (४१) यांचे सोमवारी पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘जोगवा’ चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, त्यापाठोपाठ ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ असे लागोपाठ वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणाऱ्या राजीव पाटील यांनी नुकतेच ‘वंशवेल’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले होते. याच चित्रपटाच्या प्रसिध्दीत गुंतलेल्या राजीव पाटील यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. मूळचे नाशिकचे असणाऱ्या राजीव पाटील यांच्यावर आज, मंगळवारी नाशिक येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी इरा, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.
राजीव पाटील यांचे कुटुंब नाशिक येथे स्थायिक असून ते एकटेच बोरिवली येथे राहत होते. सोमवारी सकाळी  त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांचे बंधू प्रशांत पाटील यांना कळवण्यात आले. अखेर, प्रशांत यांनी घर उघडल्यानंतर राजीव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
राजीव यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मराठी कलावंतांनी भगवती रुग्णालयाकडे धाव घेतली. आदेश बांदेकर, चिन्मय मांडलेकर, अवधूत गुप्ते, अजय गोगावले, श्रेयस तळपदे, मुग्धा गोडसे, पंढरीनाथ कांबळे अशा अनेक कलाकारांनी आपल्या सहकाऱ्याचे अंतिम दर्शन घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:33 am

Web Title: national award winner director rajiv patil passed away
Next Stories
1 ‘कॅम्पा कोला’तील रहिवाशांना चार आठवड्यांची अखेरची मुदत
2 आता संक्रमण शिबिरे नाहीत
3 व्हिडिओ ब्लॉग : अमेरिकी सरकारचे आर्थिक कामकाज ठप्प
Just Now!
X