राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मुष्टियुद्ध स्पर्धा खेळणाऱ्या एका बॉक्सरला घरफोडी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. पंचाक्षरी संघय्या स्वामी उर्फ जेम्स (२५) असे त्याचे नाव आहे. चित्रपटासाठी लागणारा मूव्ही कॅमेरा विकत घेण्यासाठी त्याने गेल्या सहा महिन्यांत तब्बल ५० घरफोडय़ा केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून सव्वा कोटीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पंचाक्षरी स्वामी हा मूळ सोलापूरचा असून चांगल्या घरातील आहे. त्याचे वडील रेल्वेत होते तर आईसुद्धा रेल्वेत लेखापाल विभागात आहे. त्याला दारूचे व्यसन होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाडय़ाने महागडे कॅमेरे लागतात. असा कॅमेरा घेऊन जर भाडय़ाने दिला तर महिन्याला दीड ते दोन लाख रुपये मिळतात, असे त्याला समजले होते.
त्यामुळे सुमारे ७० लाखांचा मूव्ही कॅमेरा घेण्यासाठी त्याने घरफोडय़ा करायला सुरवात केली. जुलै ते डिसेंबर या काळात त्याने तब्बल ५० घरफोडय़ा केल्या. चेंबूर येथे तो घरफोडी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच त्याला सापळा लावून अटक केल्याचे युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी सांगितले. त्याच्या रेहान उर्फ राहुल नावाच्या साथीदारालाही अटक करण्यात आली असून एकाचा शोध आहे.
कॅमेऱ्यासाठी सुरू झालेली चोरीची सवय वाढत गेली आणि त्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात एकामागोमाग अशा ५० घरफोडय़ा केल्या. त्यांच्याकडून सहा प्रकरणातील २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 तसेच चोरी केलेल्या पैशांतून विकत घेतलेला ७० लाखांचा मूव्ही कॅमेरा, होम थिएटर, स्पोर्टस बाईक आदी ७६ लाखांचा ऐवजही जप्त केला आहे. पंचाक्षरी हा फक्त लोखंडी कटावणीच्या सहाय्याने कुठलाही आणि कितीही मजबूत दरवाजा आणि कपाट उघडण्यात वाकबगार होता, असे काळे यांनी सांगितले. २००५ ते २००७ या काळात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तो मुष्टियुद्ध स्पर्धा खेळला होता.