जात प्रमाणपत्र अवैध

जात पडताळणीत प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जोगेश्वरी येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका नाजिया सोफी यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या आता आठ झाली आहे. या प्रभागात दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाल्याने ही जागा सेनेला मिळण्याची शक्यता आहे.

२०१७च्या पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यापैकी चार नगरसेवकांचे पद आधीच रद्द झाले आहे. प्रभाग क्रमांक ७८ च्या नाजिया अब्दुल जब्बार सोफी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची घोषणा सोमवारी महापौरांनी केली. या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवार नेहा खुर्शीद आलम शेख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

यापूर्वी भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. प्रभाग २८ मधील काँग्रेसच्या राजपती यादव, प्रभाग ७६ मधील भाजपच्या केशरबेन पटेल आणि प्रभाग ८१ मधील मुरजी पटेल या पटेल पतीपत्नीचे नगरसेवक पद धोक्यात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवत प्रमाणपत्र अवैधच असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर तिघांचेही नगरसेवक पद रद्द करण्यात आले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ दोनने घटले आहे.

आताचे संख्याबळ

  • शिवसेना – ९३ (तीन अपक्षांचा पाठिंबा)
  • भाजप – ८३ (दोन अपक्षांचा पाठिंबा)
  • काँग्रेस – ३१ ल्ल राष्ट्रवादी – ८
  • मनसे – १ ल्ल समाजवादी – ६
  • एमआयएम झ्र् २

भाजपचे संख्याबळ घटले

पालिकेत भाजपचे ८३ सदस्य आहेत. एक अपक्ष उमेदवार आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ ८५ आहे. मात्र ही संख्या आता ८३ झाली आहे. काँग्रेसचे ३१ नगरसेवक होते. मात्र भांडूपची पोटनिवडणूक हरल्यामुळे ही संख्या ३० वर आली होती. मात्र शिवसेनेच्या सगुण नाईक यांचे नगरसेवक पद गेल्यानंतर त्यांच्या जागी काँग्रेसच्या रफिक शेख यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ही संख्या पुन्हा ३१ वर गेली आहे.