|| उमाकांत देशपांडे

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे राज्य सरकारला पत्र

डोंगरी इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्यात आलेल्या अडथळ्यांमुळे, दुर्घटनास्थळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत गर्दी आवरा, अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) राज्य सरकारला पाठविले आहे.

बघ्यांच्या गर्दीमुळे आणि  स्वयंसेवकांच्या गोंधळामुळे मदत कार्यात अडचणी येतात आणि दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविता येत नाहीत, असे ‘एनडीआरएफ’ची व्यथा असल्याने बघ्यांना आवर घाला, असे आदेशच राज्य सरकारने पोलीस महासंचालक, सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील डोंगरी येथे १५ जुलै रोजी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जण ठार, तर ४० हून अधिक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर बघ्यांची गर्दी उसळली, अनेक स्वयंसेवक बचावासाठी उतरले आणि गोंधळ निर्माण झाला. त्याचवेळी मोबाइलवर छायाचित्रण करण्यातही अनेक जण गुंतले होते. या अनुभवानंतर पाच दिवसांनी ‘एनडीआरएफ’ने राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. डोंगरी येथे दुर्घटनास्थळी ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल झाले, तेव्हा गर्दीमुळे गोंधळ आणि कोलाहल होता.

ढिगाऱ्याखालील सूक्ष्म हालचाली वा लहानशा आवाजाचीही यंत्राद्वारे नोंद घेता येते आणि ढिगारा दूर करून नागरिकांना वाचविले जाते. पण डोंगरी येथे गर्दीमुळे बराच वेळ गोंधळ सुरू असल्याने अडकलेल्या नागरिकांचा आवाज टिपून मदत करणे अशक्य झाले होते. पावसाच्या दोन सरी आल्यावर गर्दी पांगली आणि एनडीआरएफला बचावकार्य करता आले. त्यानंतर एक महिला व लहान मुलाचा आवाज टिपून त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढता आले.

दुर्घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीला आवर घालावा, अशी सूचना एनडीआरएफने केली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. त्यानुसार राज्य सरकारने पोलीस महासंचालक, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.