लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : राज्यात पर्यटनावरील अनेक र्निबध शिथिल झाले असताना अद्याप बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पुरातत्त्व विभागाची राज्यातील संग्रहालये व वारसा स्मारके खुली होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या महिनाभरात राज्यात अनेक ठिकाणी पर्यटनावर र्निबध खुले झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची हजेरी लागली. मात्र काही ठिकाणी अद्याप बंधने आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या महिन्याच्या १४ तारखेपासून प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांना नियंत्रित स्वरूपात परवानगी देण्यात आली. एकूण पासधारकांपैकी केवळ एकतृतीयांश पासधारकांनाच एका दिवशी प्रवेश दिला जातो. त्यानंतर १ डिसेंबरपासून उद्यानात सर्वसामान्य पर्यटकांनादेखील प्रवेश देण्याबाबत नियोजन सुरू होते. मात्र रुग्णसंख्येतील वाढ, काही राज्यांच्या सीमांवरील बंधनामुळे हा निर्णय काही दिवस पुढे ढकलल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यान हे मुंबईकरांबरोबरच बाहेरून आलेल्या पर्यटकांचेही आकर्षणाचे ठिकाण आहे. त्यामुळे प्रवेश शुल्कापोटी महिन्याला सुमारे ७० ते ७५ लाख रुपये महसूल जमा होतो. उन्हाळी सुट्टी, पावसाळा, दिवाळी सुट्टी या काळात त्यात बरीच वाढदेखील होते. मात्र या सर्वच मोसमांत उद्यान पर्यटकांसाठी बंद राहिले. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत सुमारे सवा सहा कोटी रुपयांच्या महसुलास फटका बसला. राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अखत्यारीतील १३ संग्रहालये आणि ४० वारसा स्मारके ही टाळेबंदीत पर्यटनासाठी बंद करण्यात आली. या ठिकाणी पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रणाली तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

४० वारसा स्मारकांमध्ये प्रवेश बंद

गेल्या महिन्यात अनेक जिल्ह्य़ांमध्ये गिर्यारोहणास परवानगी देण्यात आली. राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील गिरिदुर्गावर पहारेकरी, कुलूपबंद प्रवेशद्वार असण्याचे प्रमाण मर्यादित आहे. मात्र भुईकोट आणि अन्य वारसा स्मारकांना कुलूपबंद प्रवेशद्वार, पहारेकरी व इतर कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. अशा ४० वारसा स्मारकांमध्ये सध्या पर्यटकांना प्रवेश बंद आहे.