असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या कंपनीतर्फे लखनौच्या कैसरबाग येथील हेराल्ड हाऊस नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयातून नॅशनल हेराल्ड हे इंग्रजी, नवजीवन हे हिंदी व कौमी आवाज हे उर्दू दैनिक प्रसिद्ध होत असे. त्यांचा काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असूनही संपादक एम. चलपती राव यांनी आपला स्वतंत्र बाणा जोपासला होता. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन अशा दिग्गजांचा तेथे कायम राबता असे. राव यांचे त्यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध असूनही त्याचा वर्तमानपत्रांच्या सडेतोड आणि नि:पक्षपाती भूमिकेवर कधी प्रभाव पडला नव्हता. त्यामुळेच स्वातंत्र्यलढय़ात आणि त्यानंतरही या वर्तमानपत्रांना जनमानसात सन्मानाचे स्थान होते. नेहरू, गोविंद वल्लभ पंत, रफी अहमद किडवाई, लालबहादूर शास्त्री यांसारख्या नेत्यांसाठीही नॅशनल हेराल्डचे महत्त्व दिल्ली किंवा चेन्नईहून प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही वृत्तपत्रापेक्षा कमी नव्हते. राज्यशकट हाकताना हेराल्डमधील विचार कायमच मार्गदर्शक ठरत. मात्र इंदिरा गांधी यांच्या हाती पंतप्रधानपद आल्यानंतर ही परिस्थिती बदलू लागली. आणीबाणीतील दडपशाहीलाही न जुमानणाऱ्या हेराल्डवर ताबा मिळवण्यासाठी इंदिरा गांधींचे प्रयत्न सुरू झाले. गांधी-नेहरू घराण्याचे विश्वासू समजले जाणारे उमाशंकर दीक्षित यांची हेराल्डच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी लागली. दीक्षित पुढे केंद्रीय गृहमंत्री झाले. त्यानंतर त्यांची जागा यशपाल कपूर यांनी घेतली. कपूर यांनी एम. चलपती राव यांना पदोपदी अडचणी आणल्याने वैतागून अखेर राव यांनी संस्था सोडण्याचा निर्णय घेतला. कपूर यांना वृत्तपत्रापेक्षा त्याच्या स्थावर मालमत्तेत जास्त रस होता. दरम्यान हेराल्डची दिल्ली आवृत्तीही सुरू होऊन राजधानीतही संस्थेला मोठय़ा जागा सवलतीत मिळाल्या होत्या. एजेएलची स्थावर मालमत्ता वाढत जाऊनही कर्मचाऱ्यांची स्थिती मात्र खालावत होती. कालांतराने वेळेवर पगार होणेही दुरापास्त झाले आणि कामगार कायदे धाब्यावर बसवून अनेकांना सक्तीची निवृत्ती दिली गेली. आता काँग्रेस नेत्यांचा संस्थेच्या मोक्याच्या जागी असलेल्या आणि सोन्याचा भाव आलेल्या स्थावर मालमत्तांवर डोळा होता. त्या हडपण्यासाठी सोनिया आणि राहुल यांनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत घोटाळा केला, असा आरोप आहे. त्यांच्यासह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस आणि सॅम पित्रोदा यांची भूमिकाही संशयास्पद आहे.