13 July 2020

News Flash

अनेकांच्या जीवनात शौर्याचा प्रकाश पाडणाऱ्या हालीच्या नशिबी अंधार

राजकारण्यांची आश्वासने हवेत, सहा वर्षांनंतरही घरात वीज नाही

(संग्रहित छायाचित्र)

संजय बापट

लहान वयातच थेट बिबटय़ाच्या जबडय़ातून आपल्या बहिणीला सुखरूप सोडवून आणण्याची हिंमत दाखवत राज्यातील युवकांच्या जीवनात शौर्याचा प्रकाश पाडणाऱ्या राष्ट्रीय शौर्यपदक विजेत्या ‘धाडसी हाली’च्या आयुष्यात सहा वर्षांनंतरही अंधारच पसरलेला आहे.

शहापूर तालुक्यातील (जि. ठाणे) आदिवासी पाडय़ात राहणाऱ्या आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पदकाने सन्मानित झालेल्या हाली बरफ- कुवरे हिच्या आयुष्यातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी केवळ आश्वासनांचा पाऊस पडला आणि त्याची वाफ झाली.. आता प्रशासन आणि राजकारण्यांना त्या आश्वासनांचा पुरता विसर पडला आहे. त्यामुळे सहा वर्षांच्या संघर्ष आणि प्रतीक्षेनंतरही हालीच्या घरात मात्र साधा विजेचा दिवाही लागू शकलेला नाही.

बिबटय़ाच्या हल्ल्यातून बहिणीला वाचविणाऱ्या हालीच्या अतुलनीय धाडसाचे केवळ आदिवासी पाडय़ातच नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत कौतुक झाले. केंद्र सरकारने सन २०१३मध्य हालीला वीर बाबुराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पदकाचे सन्मानित केले. त्यानंतर तत्कालीन लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी, जनरल विक्रम सिंह यांच्यापासून राज्य आणि दिल्लीतील अनेक मंत्री, नेत्यांनी हालीचे कौतुक करीत मदतीच्या आश्वासनांचा वर्षांव केला. मात्र कोरडय़ा कौतुकाचे काही महिने संपल्यानंतर सर्वानीच हालीकडे पाठ फिरविली.

पाच मुलींचा सांभाळ करण्याची कसरत करता करता आई-वडिलांनी हालीचे राम कुवरे यांच्याशी लग्न लावून दिले. हाली आणि रामला तीन मुले असून गेल्या सहा-सात वर्षांत केवळ एक घरकुल मंजूर करून देण्यापलीकडे सरकारने काहीच दिले नसल्याची खंत हालीने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर खर्डी परिसरातील उंबरखांड ग्रुप ग्रामपंचायतीच्या परिसरात कुवरेपाडा येथे वर्षभरापूर्वी शेतात एक घरकुल मंजूर करण्यात आले. मात्र आजही या चार भिंतीच्या घरात खिडक्यांना दारे नाहीत, शौचालय, स्नानगृहाच काय, वीज-पाण्याचाही पत्ता नाही. मजुरीचे पैसे थकल्यामुळे घराचे पुढचे कामही थांबले आहे.

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांपूर्वी येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंढरघोळ आश्रमशाळेत साफसफाईचे काम मिळाले असून त्या पैशावरच सध्या पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. सध्या या घरात राहण्याची सोय नसल्याने आश्रमशाळेतच आम्ही राहत असून सरकारने किमान घराला वीज आणि पाणी तरी द्यावे, असे आर्जव कुवरे दाम्पत्याने केले.

हालीचे शौर्य..

आटगावजवळील नांदगावच्या जमनाचा पाडा येथे आपल्या पाच भावंडांसमवेत एका झोपडय़ात राहणारी हाली रघुनाथ बरफ सन २०१३ मध्ये तिच्या अतुलनीय शौर्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आली. वयाच्या १३-१४ व्या वर्षी मोठी बहीण शकुंतला समवेत तानसा धरणाच्या जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या बरफ भगिनींवर बिबटय़ाने हल्ला केला. बिबटय़ाच्या हल्ल्यात शकुंतला गंभीर जखमी झाली. बिबटय़ा शकुंतलाला ओढत नेत असतानाच जिवाची पर्वा न करता हालीने आरडाओरड करीत बिबटय़ावर दगडांचा मारा करून त्याला पळवून लावले. गंभीर जखमी बहिणीला आसपासच्या लोकांच्या मदतीने तिने रुग्णालयात वेळीच उपचारार्थ दाखल केले. त्यामुळे तिचे प्राण वाचले.

हालीचे ‘हाल’..

राज्य सरकारने हालीच्या धाडसापासून मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘बालभारती’च्या चौथी इयत्तेतील पुस्तकात ‘धाडसी हाली’ हा धडाही समाविष्ट केला. त्यानंतर घरातील आठराविशे दारिद्रय़ दूर होईल आणि कुटुंब सुखी होईल, अशी भाबडी आशा हालीच्या मनात निर्माण झाली होती. मात्र राष्ट्रीय शौर्य पुरस्कारापासून अनेक संस्था आणि व्यक्तींकडून मिळालेली सन्मानचिन्हे सुरक्षित ठेवण्यासाठीही जागा नसल्याने ती एका शिक्षकाकडे ठेवण्याची वेळ हालीवर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 1:02 am

Web Title: national honors medal winner are now poor bad condition abn 97
Next Stories
1 शाळांच्या तपासणीसाठी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव
2 राष्ट्रपती राजवटीमुळे सरकार स्थापनेची कसरत !
3 पारा घसरला, थंडीचे आगमन अद्याप नाही
Just Now!
X