अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध’ (एनटीएस) आणि ‘नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप’ (एनएमएमएस) या दोन शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ नोव्हेंबरला होणार आहेत.
आठवीच्या स्तरावर होणाऱ्या एनटीसी परीक्षेला राज्यभरातून ६२ हजार विद्यार्थी बसतील. तर एनएमएमएस ही परीक्षा ८२ हजार विद्यार्थी देतील. सकाळी ११ ते १२.३० आणि दुपारी १.३० ते ३ या वेळेत हे पेपर होतील.
एनटीएसचा १८ नोव्हेंबरला पहिला टप्पा पार पाडल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १२ मे रोजी दुसरी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर या मुलांची शिष्यवृत्तीपूर्व मुलाखत घेतली जाईल. शिष्यवृत्तीधारकास दरमहा ५०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. या वर्षी कोणताही पूर्वसूचना न देता ही परीक्षा आठवीऐवजी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही राज्यभरातून ६२ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज या परीक्षेकरिता आले.  
एनटीएसच्या प्रथम स्तरावरील लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या ज्ञानाची कसोटी पाहिली जाईल. मानसिक क्षमता कसोटी आणि शालेय क्षमता कसोटी या दोन प्रकारांना प्रत्येकी ९० गुण देण्यात आले आहेत. शालेय क्षमता कसोटीत सामाजिक शास्त्र (३५गुण), मुलभूत विज्ञान (३५ गुण), गाणित (२० गुण) अशी गुणांची विभागणी आहे. द्वितीय स्तराच्या परीक्षेतही दोन क्षमतांची कसोटी पाहिली जाईल.