ठाण्यातील ‘ठाणे क्लब’च्या नव्या व्यवस्थापनाच्या आडमुठेपणाचा विषय गेले काही दिवस गाजत असतानाही ठाणे महापालिकेने काहीही हस्तक्षेप केला नाही. मात्र त्यामुळे संतप्त झालेल्या ठाणेकर पालकांनी अखेर स्वतच रस्त्यावर येऊन सविनय सत्याग्रह केला. क्लबमधील ऑलिम्पिक दर्जाच्या तरणतलावामध्ये शहरातील राष्ट्रीय जलतरणपटूंनी मंगळवारी अखेर पुन्हा प्रवेश करून सराव केला. नव्या व्यवस्थापनाने रविवारी जलतरणपटूंना तरण तलावातून बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
ठाणे शहरामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे तरणतलाव असून ठाणे क्लबचा तरणतलाव ऑलिम्पिकदर्जाचा आहे. या तलावामध्ये गेल्या पाच वर्षांपासून ठाण्यातील २० हून अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सराव करत असून त्यांना त्यासाठी वर्षांचे ७ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जात होते. डिसेंबर २०१४ मध्ये नव्या व्यवस्थापनाने ठाणे क्लबचा ताबा घेतला आणि जलतरणपटूंना सरावासाठी तरणतलावातील प्रवेश बंद करण्यात आला होता. नव्या दरानुसार शुल्क भरल्यानंतरच  सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्यात येईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मात्र मध्यमवर्गीय असलेल्या या जलतरणपटूंना ठाणे क्लबच्या नव्या व्यवस्थापनाची अवाच्या सव्वा सदस्य नोंदणी शुल्क भरणे शक्य नसल्याचे पालकांनी व्यवस्थापनाला कळवले होते.
पालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या तरण तलावावर सामान्य नागरिकांचा हक्क असून, नव्याने घडणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या विद्यार्थ्यांंना अल्पदरामध्ये हा तरणतलाव उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांनी केली होती.
हस्तक्षेप नाही
 या प्रकरणानंतर रविवारी जुन्या व्यवस्थापनाने पालकांना बोलावून सराव करण्याची परवानगी दिली होती. यापुढे कोणत्याही प्रकारची आडकाठी केली जाणार नाही, असे आश्वासन दिलेले असतानाही सरावासाठी उतरलेल्या जलतरणपटूंना तलावातून बाहेर काढले होते. मात्र यावर ठाणे महापालिकेने काहीही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे अखेर मंगळवारी जलतरणपटू आणि पालकांनी एकत्र येऊन ठाणे कल्बच्या तरण तलावामध्ये प्रवेश करून तीन तास मनसोक्त पोहण्याचा सराव केला.
आंदोलन सुरूच
यावेळी नव्या व्यवस्थापनाच्या वतीने एका अधिकाऱ्याने पालकांची चौकशी केली. मात्र नव्या व्यवस्थापनाने यावेळी जलतरणपटूंना कोणत्याही प्रकारची आडकाठी केली नाही. यापुढेही पालकांचे हे सविनय आंदोलन सुरूच राहील, असे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत ठाणे क्लबच्या व्यवस्थापनाशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
आम्हाला पोहू द्या!
ठाणे जिल्हा जलतरण संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर ठाण्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना पोहण्यापासून वंचित ठेवल्यानंतर अखेर मंगळवारी या जलतरणपटूंनी ‘आम्हाला पोहू द्या’ अशी मागणी ठाणेकरांसमोर केली. जलतरण ही आमच्यासाठी आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असून त्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. पोहणे आमच्यासाठी सुसह्य़ व्हावे याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची विनंती या लहानग्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.

‘लोकसत्ता’चे आभार
’ठाणे महानगरपालिकेची मालकी असलेल्या ठाणे क्लबवर ठेकेदाराची वरकमाई सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केल्यानंतर आत्मविश्वास निर्माण झाल्याचे पालकांनी सांगितले. ’राजकीय नेते, विरोधक, प्रशासन आणि सामाजिक संस्था याप्रकरणी कोणत्याही प्रकारे आवाज उठवत नसताना ‘लोकसत्ता’ने या प्रकरणाला वाचा फोडून या जलतरणपटूंच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतल्याने या पालकांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले.   

जलतरणपटूंना सरावाची गरज
सरावाने खेळाडू घडत असून राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारे जलतरणपटू ठाणे शहरात आहेत. हे जलतरणपटू दिवसाला सुमारे तीन तासांचा सराव करत असून गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा सराव सुरू आहे. नव्या व्यवस्थापनाने त्यांना जलतरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूला देशामध्ये खेळाडू घडवण्यासाठी शासकीय स्तरावरून हाक दिली जात असताना ठाण्यातील जलतरणपटूंची मात्र अशी मुस्कटदाबी केली जात आहे.         जलतरणपटूंचे पालक
श्रीकांत सावंत, ठाणे