सरकारपाठोपाठ पक्षसंघटनेत बदल करण्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भर दिला असून, शनिवारी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. तरुण चेहऱ्याला संधी देण्याचे पवार यांनी सूचित केल्याने ही जबाबदारी कोणावर पडते याबाबत पक्षात उत्सुकता आहे.
मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्यांना पक्षसंघटनेत सामावून घेण्यात येणार आहे. तरुण चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांच्यासह ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. आधीच्या योजनेनुसार बबनराव पाचपुते यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्या जागी पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार होता. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता तरुण आणि आक्रमक चेहरा पुढे आणण्यावर पक्षाने भर दिला आहे. सर्व समाजांची मते मिळविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीने मंत्रिमंडळातील मराठा मंत्र्यांचे प्रमाण कमी करून सर्व जातीपातींना सामावून घेतले. यामुळेच इतर मागासवर्गीय समाजाला संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.