आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही मंत्र्यांना संघटनेत काम करण्यासाठी पाठवले असून, त्यांच्या जागी काही नव्या चेहऱयांना संधी दिलीये. मुंबईत राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंगळवारी मधुकरराव पिचड, शशिकांत शिंदे आणि दिलीप सोपल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सुरेश धस, संजय सावकारे आणि उदय सामंत यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के, शंकरनारायणन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील विविध नेते उपस्थित होते.
गेल्या शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व २० मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. पक्षाच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल करताना तीन ते चार मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची योजना आहे. पक्षाची कामगिरी सुधारण्याकरिता हा विस्तार करण्यात येत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानुसारच या नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे.
मधुकरराव पिचड़ हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारासंघातून, शशिकांत शिंदे साताऱयातील जावळी मतदारसंघातून आणि दिलीप सोपल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघातून निवडून आले आहेत. राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले सुरेश धस बीड जिल्ह्यातील आष्टीमधून, संजय सावकारे भुसावळमधून तर उदय सामंत रत्नागिरीमधून निवडून आलेत.
भास्कर जाधव, बबनराव पाचपुते, गुलाबराव देवकर, प्रकाश सोळंके, रामराजे निंबाळकर, लक्ष्मणराव ढोबळे यांना तूर्त मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला असल्याचे समजते.