राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मराठा समाजाचा पक्ष ही निर्माण झालेली प्रतिमा पुसण्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भर दिल्याचे मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून सूचित होते. यासाठीच मराठा टक्का कमी करून ओबीसी आणि अन्य समाजाचे प्रतिनिधीत्व वाढविण्यात आले आहे. जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये सर्व समाजाची मते मिळावीत, असा प्रयत्न दिसतो.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिगर मराठा समाजाला डावलले जाते, असा चर्चेचा सूर असतो. छगन भुजबळ यांनी मागे याबद्दल चर्चेला तोंड फोडले होते.
मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला होता. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने अन्य समाज नाराज होणार नाहीत किंवा त्यांना कसे आकर्षित करता येईल, हा विचार करून मराठा टक्का कमी केला आहे.
विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे २० पैकी १० मंत्री हे मराठा होते. विस्तारात पाच मराठा मंत्र्यांना वगळून नव्या रचनेत फक्त दोनच मराठा नेत्यांना संधी देण्यात आली. इतर मागासवर्गीय समाजातील सहा जण मंत्रिमंडळात आहेत.
मधुकरराव पिचड आणि डॉ. विजयकुमार गावित हे दोन आदिवासी समाजाचे असून, मनोहर नाईक हे भटक्या आणि विमुक्त समाजाचे आहेत. नव्याने समाविष्ट करण्यात आलेले संजय सावकारे हे अनुसूचित जातीचे तर उदय सामंत हे सारस्वत समाजाचे आहेत. हसन मुश्रीफ आणि फौजिया खान हे दोन अल्पसंख्याक समाजाचे मंत्री आहेत.
मराठा आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळातील बिगर मराठा प्रतिनिधित्व वाढविण्यात आलेले नाही ना, असा शंकेचा सूर राजकीय वर्तुळात व्यक्त केला जाऊ लागला.
नव्या रचनेत २० पैकी सात मराठा, सहा इतर मागासवर्गीय (ओबीसी), दोन अनुसूचित जमाती, प्रत्येकी एक अनुसूचित जाती व भटके आणि विमुक्त जमाती, एक सारस्वत तर दोन अल्पसंख्याक अशी रचना राष्ट्रवादीने केली आहे.

प्रदेशाध्यक्षपदी कोण ?
मधुकरराव पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाची १५ तारखेला निवड करण्यात येणार आहे. आर. आर. पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती, पण त्यांचे मंत्रिपद कायम राहिल्याने त्यांच्या नावाची चर्चा थांबली आहे. तरीही जयंत पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे सांगण्यात येते. मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या ढोबळे यांचे नाव घेतले जात आहे. मराठा की बिगर मराठा अध्यक्ष होणार यावर कोणाची निवड होईल हे अवलंबून असेल. यापूर्वी प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या पाचपुते यांना पुन्हा संधी देण्याची मागे योजना होती.

शरद पवार अनुपस्थित
राष्ट्रवादीच्या सहा नव्या मंत्र्यांना राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राजभवनमध्ये झालेल्या समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित नव्हते.
पवार हे सोलापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर होते. मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्यांपैकी बबनराव पाचपुते आणि भास्कर जाधव हे दोघेच शपथविधी समारंभाला उपस्थित होते. पिचड, सोपल आणि उदय सामंत यांच्या निवडीत स्वत: पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली.
प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे अनिल देशमुख यांचा लाल दिवा वाचल्याचे बोलले जाते. अन्यथा देशमुख यांच्यावर गंडांतर आले असते. नागपूर विभागात देशमुख यांच्याशिवाय कोण आहे, अशी भूमिका पटेल यांनी घेतली.