लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांभीर्याने दखल घेत सुधारणा करण्याचा आदेश पक्षाच्या नेत्यांना मंगळवारी दिला.
नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता गमवावी लागली. धुळे आणि अकोला जिल्हा परिषदेत पक्षाची सदस्यसंख्या घटली.  पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत पवार यांनी निकालांचा आढावा घेताना झालेल्या चुकांची पुनरावृत्ती यापुढील काळात होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. नंदुरबारमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याबद्दलची नाराजी सत्ता गमविण्यास कारणीभूत ठरल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. स्वत: गावित मंत्री, त्यांचा भाऊ आमदार, बाकीचीही पदे घरात ठेवल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली.
तीन जिल्हा परिषदांच्या निकालांचा संबंध काँग्रेसने लोकसभेच्या जागावाटपाशी जोडल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. नंदुरबार आणि धुळे हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. केवळ तीन जिल्हा परिषदांच्या निकालांच्या आधारे परिस्थिती बदलली हा काँग्रेसचा दावा हास्यास्पद असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष सर्वत्र एकसंध राहिला पाहिजे, असे पवार यांनी नेत्यांना बजावले. पक्षाचे मंत्री, आमदार व अन्य नेत्यांनी पक्षाची प्रतिमा सुधारण्यावर भर द्यावा, असा आदेशही पवार यांनी दिल्याचे सांगण्यात येते.