नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाजवळून एका तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणकर्ता कैद झाला आहे. रघु शिंदे असे अपहृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकाजवळील वडापावच्या स्टॉलजवळून या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. तो आपल्या आईसोबत वडापावच्या स्टॉलजवळ थांबला होता. त्याची आई वडापाव विकत घेण्यासाठी गेली असता अपहरणकर्त्याने त्याला पळवले. रेल्वे स्थानकाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणकर्ता कैद झाला आहे. तो दारूच्या नशेत असून रेल्वे फलाटावरून जात आहे. त्याच्याजवळ एक लहान मुलगा असल्याचे त्यात दिसून येत आहे. तो मुलाला घेऊन पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.