News Flash

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : राज ठाकरेंचं शिवसेनेला आव्हान; “माझ्या बोलण्यानंतर…”

स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या विषयावर झालेल्या बैठकीसंदर्भात राज यांना प्रश्न विचारण्यात आला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली नवी मुंबई विमानतळाच्या नावासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन सुरु झालेल्या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबईतील भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज यांची आज त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं जाईल असं सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये राज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आमदारांची बैठक झाली त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राज यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे.

सध्याच्या विमानतळाचं एक्सटेन्शन

नवी मुंबईमधील विमानतळ हे सध्याच्या विमानतळाचे एक्सटेंशन असणार आहे असं सांगत राज यांनी विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असं राहणार असल्याचं म्हटलं. सध्याच्या विमानतळावर प्रवासी उतरल्यावर विमानं दुसरीकडे पार्क करावी लागत आहेत असं सांगतानाच नवं विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल तर सध्याचं विमानतळ हे डोमेस्टीक एअरपोर्ट होईल असं राज यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे हे विमानतळ पूर्ण होण्यासाठी आणखीन किमान पाच वर्षांचा कालावधी लागेल असंही राज म्हणाले.

नक्की वाचा >> नवी मुंबई विमानतळ नामांतर वाद : राज ठाकरे म्हणतात, “स्वत: बाळासाहेब असते तरी त्यांनी…”

महाराजांच्या नावावर काय चर्चा करणार?

नामकरणावरुन सुरु असणारा वाद हा जाणीवपूर्वक उकरुन काढला जातोय की नाही हे ठाऊक नाही. पण एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलतोय, असंही राज म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर काय चर्चा करणार? ज्यांना काय गोंधळ घालायचा तो घालू द्या. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी स्पष्ट केली.

राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत की…

नामांतरणावरुन सुरु असणारा वाद हा दुर्दैवी आहे, असं सांगतानाच राज यांनी हे विमानतळ लवकर कसं होईल यासाठी राज्य सरकारने रेटा लावला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे विमानतळाच्या उभारणीमध्ये येणाऱ्या अडचणींच्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. नावांसारख्या विषयांमध्ये आपल्याकडचे लोक गुंतून राहतात त्यामुळे ते बरं पडतं, असा टोलाही राज यांनी लगावला.

रस्त्यावरच्या संघर्षावर राज म्हणाले…

रस्त्यावरचा संघर्ष पहायला मिळाले असं (प्रशांत) ठाकूर यांनी सांगितलं आहे, असा प्रश्न विचारला असता राज यांनी, “मी तुम्हाला वस्तूस्थिती सांगितली की काय होईल. महाराजांचं नाव आल्यानंतर रस्त्यावरच्या संघर्षाचा विषय येईल असं मला वाटतं नाही,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

…तर आमचा विषयच संपला

स्थानिक नागरिक आहेत. खास करुन आगरी, कोळी समाज आहे त्यांनी यासाठी साखळी आंदोलन सुद्धा केलेलं, अशी आठवण राज यांना पत्रकारांनी करुन दिली. त्यावर उत्तर देताना, “मी जेव्हा ठाकुरांशी हा विषय बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की महाराजांचं नाव येणार असेल तर आमचा विषयच संपला. त्याला आम्ही आक्षेप घेणार नाही, असं सांगितलं,” अशी माहिती राज यांनी दिली.

शिवसेनेला थेट आव्हान…

पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांमध्ये झालेल्या बैठकीवरुन राज यांना प्रश्न विचारला. काल आमदारांची मुख्यमंत्र्याबरोबर बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी असा आक्षेप घेतलाय की जर तुम्ही रस्त्यावर उतरलात तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, असं पत्रकारांनी म्हटलं असता राज यांनी तातडीने आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिक रस्त्यावर उतरण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना राज यांनी, “आत्ता माझ्या बोलण्यातनंतर बघू कोण कोण (रस्त्यावर) उतरतं ते,” असं म्हटलं. या उत्तरानंतर हॉलमध्ये बराच वेळ शांततात असल्याचं दिसून आलं. मात्र त्यानंतर पुढच्याच प्रश्नावर उत्तर देताना, वेळ आली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलीन असं सांगतानाच हा मला काही चर्चेचा विषय वाटतं नाही, असंही राज यांनी म्हटलं.

नक्की पाहा >> Photos: नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांऐवजी दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

भाजपाची फूस होती या प्रश्नावर राज म्हणाले…

दि. बा. पाटलांचं नाव देण्यात भाजपाच्या काही नेत्यांची फूस होती असा प्रश्न विचारण्यात आला असता राज यांनी, “ज्यांना यात राजकारण करायचं त्यांनी करावं, पण होणार काय आहे हे मी आता तुम्हाला सांगितलं,” असं उत्तर दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 2:49 pm

Web Title: navi mumbai airport name issue on shivsena question mns chief raj thackeray says let see who will come on road after this scsg 91
Next Stories
1 नवी मुंबई विमानतळ: “….उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलत होते”; प्रशांत ठाकूर यांची टीका
2 नवी मुंबई विमानतळ नामांतर वाद : राज ठाकरे म्हणतात, “स्वत: बाळासाहेब असते तर त्यांनी…”
3 नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे
Just Now!
X