|| सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई महानगर प्रदेशात आगरी समाजाची मतपेढी दुरावण्याचा धोका

मुंबई : नवी मुंबई विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह धरत आगरी-कोळी समाज पक्षभेद विसरून एकत्र आल्याने त्याचा परिणाम राजकीय समीकरणांवर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून राजकीय प्रतिष्ठा आणि दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या राजकीय ताकदीचा प्रमुख आधार असलेला आगरी-कोळी समाज आगामी निवडणुकांत शिवसेनेपासून दुरावण्याचा धोका हा पेच निर्माण झाला आहे.

नवी मुंबई विमानतळाला ज्येष्ठ नेते व रायगडचे भूमिपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी जुनी मागणी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून के ला. त्यावरून आता नामकरणाचा वाद पेटला असून शिवसेना आणि पक्षाचा मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख राजकीय आधार असलेला आगरी-कोळी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

या सर्व परिसरांतील लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक या सर्व पातळीवर शिवसेनेची ताकद असून त्यात गेल्या तीन-चार दशकांपासून आगरी-कोळी समाज हा पक्षाचा प्रमुख राजकीय आधार आहे.

सर्व जाती-जमातींमध्ये ज्येष्ठ नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्याविषयी आदराची व कृतज्ञतेची भावना आहे. ते के वळ भूमिपुत्र नेते होते म्हणून नव्हे तर भूसंपादनात देशाला मार्गदर्शक ठरलेल्या विकसित जमीन शेतकऱ्यांना देण्याचा कायदा तसेच स्त्रीभ्रूण हत्येला पायबंद घालण्यासाठी गर्भजल निदानबंदी करण्याच्या कायद्यात दि. बा. पाटील यांचे योगदान आहे.

हा प्रश्न लवकरात लवकर सामोपचाराने सुटला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये आगरी-कोळी समाज शिवसेनेपासून दुरावेल हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे, असे आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट के ले.

शिवसेनेच्या हटवादीपणामुळे हा वाद निर्माण झाल्याची व त्यातून आजवर शिवसेनेच्या पाठिशी उभारणाऱ्या आगरी-कोळी समाजातील नवी पिढी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे विमानतळ आंदोलनासाठी स्थापन झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा विषय १२-१३ वर्षांपासून सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून सुरू झालेले आंदोलन हे आगरी-कोळी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून पुढे आले आहे. लोकसभा-विधानसभा-महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगर प्रदेशात शिवसेनेला या समाजाचा मोठा राजकीय आधार आहे हे वारंवार दिसून आले आहे. अशा परिस्थितीत नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न धोरणात्मक पद्धतीने सोडवण्यात शिवसेनेला अपयश आले तर आगामी काळात आगरी-कोळी समाज शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. – संजय पाटील, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ

या नामकरणाचा राजकीय वाद निर्माण करण्यात भाजपची मंडळी आहेत हे आता उघड झाले आहेत. रायगडमधील आगरी-कोळी समाजासाठी महत्त्वाचा असलेल्या जेएनपीटी बंदराचे महत्त्व कमी करण्याचे काम भाजप करत असून त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक राजकारण के ले जात आहे. पण आगरी-कोळी समाजाला शिवसेना हाच आपला मित्र असल्याची जाणीव पुन्हा होईल आणि राजकीय स्वार्थासाठी आगरी-कोळी समाज व शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न अपयशी ठरतील. – अरविंद सावंत, मुख्य प्रवक्ता शिवसेना