मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नवी मुंबई विमानतळातील भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झाले असून २०२० पर्यंत हे विमानतळ सेवेत येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. भूसंपादनाचा आढावा पुढील महिन्यात घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

या वेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे एक गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. विमान सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता जास्तीत जास्त विमानतळ व विमानांची गरज सध्या आहे आणि त्यानुसार भारतात कामही होत आहे. यात मुंबई विमानतळानंतर नवी मुंबईतही विमानतळ होत असून २०२० पर्यंत ते सेवेत येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात एक टक्के वाढ करण्याची त्यात क्षमता आहे. महाराष्ट्रातील पुणे नागपूर विमानतळही चांगल्या विमानतळांपैकी आहेत. ज्याच्या प्रवासी सेवांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागपूरचा भौगोलिकदृष्टीने खूप विकास होत आहे.  त्यामुळे उद्योग समूहांनी नागपूरमध्ये भेट देऊन गुंतवणुकीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.