वाशी येथील बांधकाम व्यावसायिक सुनील कुमार लोहारिया यांच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी सॅम्युअल अमोलिक या ‘चकमकफेम’ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक केली. वैयक्तिक वादातून अमोलिक याने हे कृत्य केल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात येत असले तरी या संपूर्ण हत्याप्रकरणामागे बिल्डर-पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील हितसंबंध असल्याचे समजते.
वाशी येथील एस. के. ब्रदर्सचे मालक सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या वाशी सेक्टर २८ मधील कार्यालयासमोर दोन मारेकऱ्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काहींनी व्यंकटेश शेट्टीयार या मारेकऱ्यास ताब्यात घेतली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी अमोलिक (६२) माजी पोलीस निरीक्षकास अटक केली. त्याला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी वाजीद कुरेशी, जमाल शेख, आणि फईम गुलबार या तिघांना मुंब्यातून अटक केली. त्यांची चौकशी सुरू आहे.
सुमारे महिन्याभरापूर्वी सानपाडा येथील पामबिच मार्गावर रस्त्यावरून जात असताना सुनील कुमार यांच्या गाडीने अमोलिक याला धक्का दिला व नंतर सुनील कुमार यांनीच त्याला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने अमोलिक याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे प्रकरण एवढय़ापुरतेच मर्यादीत नसून याची पाळेमुळे नवी मुंबईतील भूखंडांचे राजकारण आणि पोलीस-बिल्डर व संघटीत गुन्हेगारी टोळय़ा यांच्यातील हितसंबंधांत गुंतली असल्याचे समजते. या संदर्भात उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्याशी संपर्क साधला असता, केवळ बाचाबाचीतून बदला हे कारण नसून आणखी काही धागेदोरे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.