नवी मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी सुरू करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरविण्याच्या रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर नाईक, शिवसेनेचे मनोज हळदणकर व सतीश रामाणे आणि काँग्रेसचे अमित पाटील महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. नवी मुंबईच्या महापौरपदासाठी १ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. हे पद इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते, पण चौघांनीही अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया रद्दबातल ठरवली. तसेच नवी प्रक्रिया १७ डिसेंबरपासून राबविण्याचा आदेश दिला. त्या वेळी जात प्रमाणपत्र लागत असल्यास आपण ते तात्काळ सादर केले असते. त्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज होती. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्दबातल ठरविण्याची काहीच आवश्यकता नव्हती. नाईक यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे ते मिळविण्यासाठी त्यांना आवश्यक वेळ उपलब्ध व्हावा. यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरवून ती नव्याने राबविण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप हळदणकर व रामाणे यांनी याचिकेद्वारे केला आहे, तर नाईक यांनीही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्याच्या विरोधात याचिका केली आहे.