नवी मुंबईतील कळंबोली भागात रेल्वे रुळांवर लोखंडी खांब ठेवल्याची घटना ताजी असतानाच, गव्हाण फाटाजवळ रेल्वे रुळांवर विजेचा खांब ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई आणि नवी मुंबईत रेल्वे मर्गांवर घातपात घडवण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपू्र्वी दिवा-पनवेल मार्गावरील नेवडे फाटा येथे रेल्वे रुळांवर लोखंडी खांब ठेवण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र, मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला होता.

पनवेलजवळ गव्हाणफाटा येथे रेल्वे रुळांवर विजेचा खांब आडवा टाकण्यात आला होता, तो रेल्वेमार्ग जेएनपीटीकडे जाणारा आहे. जेएनपीटी बंदरात येणाऱ्या मालाची मालगाड्यांद्वारे वाहतूक केली जाते. या रेल्वे मार्गावरील रुळांवर विजेचा खांब ठेवण्यात आल्याने हा घातपाताचा कट तर नाही ना?, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत दोनदा मोठे रेल्वे अपघात टळले आहेत. काही दिवसांपूर्वी दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात टळला. मोटरमनने प्रसंगावधान राखल्याने हजारो प्रवाशांचे प्राण वाचले होते. नेवडे फाट्याजवळ रेल्वे रुळांवर लोखंडी खांब ठेवल्याचे आढळले होते. त्याचवेळी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरून पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेस जात होती. नेवडे फाटा येथे एक्स्प्रेस आली असता, रेल्वेगाडीखाली जड वस्तू अडकल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गाडी थांबवली. त्यांनी खाली उतरून पाहिले असता, रेल्वे रुळांमध्ये लोखंडी खांब असल्याचे निदर्शनास आले. त्यापूर्वी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या मार्गावर अशाच प्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता. त्यावेळीही मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अपघात टळला होता. या गंभीर घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, कानपूरमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुखराया स्थानकाजवळ झालेल्या अपघातात जवळपास दीडशे प्रवाशांचा मृत्यू झाला होता.