Navi Mumbai Municipal Corporation mayor election, shiv sena,bjp Navi Mumbai Municipal Corporation mayor election, shiv sena,bjp,
News Flash

नवी मुंबईत सेनेची भाजपकडून कोंडी

नवी मुंबई महापौर व उपमहापौरांची अडीच वर्षांंची मुदत ९  नोव्हेंबर रोजी संपत आहे.

महापौरपदासाठी पाठिंबा नाही; ‘घोटाळेबाज भाजप’ पुस्तिकेवरून पक्षनेतृत्वाची नाराजी

औरंगाबाद निवडणुकीत शिवसेनेला सहकार्य करूनही शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, हे कमी म्हणून की काय सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांची एक पुस्तिकाच काढत असेल, तर यानंतर शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई महापौर निवडणुकीपासून करण्यात आली आहे. भाजपच्या पांठिब्यावर नवी मुंबई महापौर निवडणूक जिंकण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या शिवसेनेला धोबीपछाड देण्याच्या उद्देशाने भाजपने शुक्रवारी आपल्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उरलेसुरले अवसान गळून पडले असून महापौरपदासाठी गेले दोन महिने मोर्चेबांधणी करणारे आणि त्यासाठी घोडेबाजाराला चालना देणारे संभाव्य उमेदवार विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. महापौरपद हातातून निसटल्याची जाणीव झालेल्या शिवसेनेने केवळ निवडणूक लढविल्याचा आभास निर्माण करण्यासाठी एका नगरसेवकाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नवी मुंबई महापौर व उपमहापौरांची अडीच वर्षांंची मुदत ९  नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांच्या जागी त्याच दिवशी नवीन महापौर उपमहापौरांची निवड होणार आहे. पालिकेत  मात्र अडीच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवक नाराज होते.

मुंबई, ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत पक्षाचा महापौर करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते.

५० नगरसेवकांची मोट बांधण्यास शिवसेना यशस्वी झाल्यास राज्यात दोन पालिकांमध्ये झालेली शिवसेना-काँग्रेस युतीची पुनरावृत्ती नवी मुंबईत करण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली होती. त्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळणार होता. याच वेळी हक्काचा पाठिंबा असलेल्या भाजपने शिवसेनेला महापौर निवडणुकीत साथ न देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घेतला. पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत सकारात्मक भूमिका घेतली होती पण शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या ‘घोटाळेबाज भाजप’ या पुस्तिकेवरून मुख्यमंत्री कमालीचे संतापले असल्याचे समजते. शिवसेना नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत असल्याने ही नाराजी जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेला धोबीपछाड देण्यास चालून आलेल्या संधीचे सोने करताना शिवसेनेला पांठिबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. भाजपने पांठिबा काढून घेतल्याचे समजताच ५० नगरसेवकांच्या जुळवाजुळवीची वाट पाहणाऱ्या काँग्रेसने घूमजाव करून आपला आघाडी धर्म बरा म्हणत राष्ट्रवादीबरोबर जुन्या करारनाम्यानुसार उपमहापौरपद घेऊन पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महापौरपदाची बिकट वाट मोकळी झाली आहे.

पालिकेतील समीकरणे

  • १११ नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी ५२, शिवसेना ३८, काँग्रेस १०, भाजप ६ आणि अपक्ष ५ असे संख्याबळ आहे.
  • स्पष्ट बहुमत नसल्याने राष्ट्रवादीने अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व पाच अपक्षांच्या बळावर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष सुधाकर सोनावणे यांना महापौर केले होते
  • राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक, दोन अपक्ष आणि भाजपचे सहा नगरसेवक गृहीत धरून शिवसेना बहुमताच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करीत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 3:26 am

Web Title: navi mumbai municipal corporation mayor election shiv sena bjp navi mumbai municipal corporation mayor election shiv senabjp navi mumbai municipal corporation mayor election shiv senabjp
Next Stories
1 ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मौनाने नेटकर मेटाकुटीला
2 श्रुती कुलकर्णी आणि अक्षय चव्हाण ब्लॉग बेंचर्सचे विजेते
3 पाच हजार डॉक्टर पदव्युत्तर परीक्षेला मुकणार!
Just Now!
X