नवी मुंबईत राजकीय भूकंप झाला आहे. कारण राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपात जाणार आहे. नवी मुंबईत राजकीय भूकंप झाला आहे यात काहीही शंका नाही. आज झालेल्या बैठकीत ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश नाईक भाजपात जाणार की नाही हा सस्पेन्स कायम आहे. मात्र ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

नवी मुंबईत आता सगळीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत. जर राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपात गेले तर नवी मुंबई महापालिकेतली राष्ट्रवादीची सत्ता जाईल. गणेश नाईक हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांनी मात्र या विषयावर मौन सोडलेलं नाही. त्यामुळे गणेश नाईक काय निर्णय घेतात याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनी बैठकीमध्ये एकमुखाने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आता या निर्णयामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले. ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही आनंद परांजपे हे ४५ हजार मतांनी मागे होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत राहिलो तर आपले काही खरे नाही असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. आता गणेश नाईक काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे मुंबईतले नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर दोनच दिवसांनी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. त्या ३० जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ आता गणेश नाईकही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र गणेश नाईक भाजपात जाणार की नाही याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. कारण त्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.