गेल्या तीन महिन्यांत तीन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका कथित ‘गॅस सिलेंडर डिलीव्हर बॉय’चा नवी मुंबई पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलीसांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये या कथित ‘डिलिव्हरी बॉय’ची कृत्ये कैद झाली असून, खारघरमध्ये आरोपीने १३ एप्रिल ते ९ जून या काळात ९ वर्षांच्या दोन मुलांशी अश्लिल चाळे करताना आढळून आला आहे. पोलिसांच्या संशयानुसार याच व्यक्तीने कांदिवली आणि दिंडोशी भागातही आणखी काही मुलांसोबत अशा प्रकारचे कृत्य केले असावे.

आरोपीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीनुसार, जी लहान मुले आपल्या घराबाहेर एकटी खेळत असतात अशांना तो टार्गेट करतो. यावेळी तो स्वत: ची ओळख गॅस सिलेंडर पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगतो. तो एकट्या मुलाला हेरून तुझ्या पालकांनी मला सिलिंडर घेऊन बोलावले असल्याचे सांगताना आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्यास सांगतो. संबंधीत मुलाचा त्याच्यावर विश्वास बसल्यानंतर तो आपल्याजवळील एका कागदाच्या तुकड्यावरील पावडर त्या मुलाच्या नाकाजवळ नेऊन त्याला बेशुद्ध करतो, त्यानंतर आरोपी त्या मुलाला एखाद्या निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करतो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. आमची पथके या व्यक्तीच्या मागावर असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त तुषार दोशी यांनी सांगितले.