वाढत्या रुग्णसंख्येमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला प्राधान्य दिल्याने प्रभागनिहाय मतदारयाद्या ३ मार्चपर्यंत जाहीर करणे शक्य होणार नाही. परिणामी नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकांसह राज्यातील ९८ नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकांमध्ये ३ मार्चपर्यंत प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती; परंतु सध्या करोनाचे रुग्ण वाढल्याने पालिकांची सारी यंत्रणा या कामात गुंतली आहे. तिन्ही महापालिकांमध्ये ३ मार्चपर्यंत हरकती व सूचनांवर विचार करून अंतिम मतदार याद्या जाहीर करणे शक्य होणार नाही. तिन्ही महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवर हजारो हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. त्यावर आठवडाभरात निर्णय होणे शक्य नाही.

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या कधी जाहीर करायच्या याची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे पत्रच राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना शुक्रवारी पाठविले. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानेच लगेचच निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोग साशंक आहे.

मध्यंतरी करोना रुग्ण कमी झाल्याने बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात तीन महानगरपालिका, ९८ नगरपालिका आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने केली होती; परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने एप्रिलमध्ये निवडणुका होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.