कपिल शर्मा शो मधून नवज्योत सिंग सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी टीकेचा भडीमार करत कपिल शर्मा शोमधून सिद्धूंना हाकला अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही कारवाई झाल्याचे दिसून येते आहे. मूठभर लोकांसाठी तुम्ही पाकिस्तानला दोष का देता असेही सिद्धू यांनी विचारले होते. मी झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो मात्र पाकिस्तानशी चर्चा करूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे अशी प्रतिक्रिया नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर दिली होती. ज्यानंतर त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. त्यांना कपिल शर्मा शो मधून हाकलून द्या अशीही मागणी नेटकऱ्यांनी केली होती आता त्याच संदर्भातले वृत्त आले आहे.

14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध देशभरातून होत आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या, पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी केली जाते आहे अशात सिद्धू यांनी मात्र पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे अशी भूमिका घेतली होती, ज्यामुळे त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. मात्र हेच वक्तव्य त्यांना भोवलं आहे. कपिल शर्मा शोमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी तर #BoycottSidhu हा ट्विटर ट्रेंडही केला आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने कपिल शर्मा शोमधून नवज्योत सिंग सिद्धू यांची हकालपट्टी झाल्याचे वृत्त दिले आहे.

सिद्धू यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका होते आहे, यानंतर कपिल शर्मा शो चालवणाऱ्या वाहिनीने त्यांची तातडीने त्यांची हकालपट्टी केली आहे. या वाहिनीने सिद्धूंना हाकला अशा सूचना शोच्या प्रॉडक्शन हाऊसला केल्या आहेत. तसेच ही हकालपट्टी तात्पुरत्या नाही तर कायमस्वरूपी प्रकारातली आहे असेही बजावण्यात आले आहे. हा निर्णय मान्य करत अर्चना पूरणसिंग या अभिनेत्रीसोबत प्रॉडक्शन हाऊसने दोन एपिसोडचे शुटींगही केले आहे त्यामुळे अर्चना पूरणसिंग सिद्धूंच्या जागी या शोमध्ये दिसतील अशीही चर्चा रंगली आहे. अर्चना पूरणसिंग यांचे नावच सिद्धूंच्या जागी आहे का हे अद्याप वाहिनीने सांगितलेले नाही.