चिखल झालेल्या मैदानांत आयोजकांची व्यवस्था

मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढणाऱ्या पावसाच्या सरींचा गरबा सुरूच असल्याने आज, गुरुवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवातील गरब्यापुढे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठमोठय़ा दांडिया, गरबा उत्सवांत हजेरी लावण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासून हजारो रुपयांचे पास खरेदी करून बसलेल्या दांडियाप्रेमींची पावसामुळे निराशा होऊ नये, यासाठी दांडिया आयोजकांनी नामी शक्कल लढवली आहे. पावसामुळे उत्सवस्थळी मैदानात झालेल्या चिखलात थिरकण्याची पाळी गरबाप्रेमींवर येऊ नये, यासाठी या मैदानात लाकडी फळय़ा अंथरण्यात येत आहेत. याशिवाय पावसाचा जोर कायम राहिल्यास खबरदारी म्हणून उत्सवस्थळी ताडपत्रीचे छतही उभारण्यात आले आहे.

यंदा पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे कच्छी मैदान, दिवंगत प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कोरा केंद्र येथे सर्वात मोठय़ा स्तरावर गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. पावसामुळे गरबाप्रेमींची हिरमोड होऊ नये म्हणून या तिन्ही मैदानात लाकडी फळ्यांचे आच्छादन पसरण्यात आले आहे. त्यामुळे पाऊस असला तरी गरब्याचा आवाज मुंबईत घुमेल, असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत. या शिवाय कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

बोरीवलीत नायडू क्लबतर्फे कोरा केंद्र येथे गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. गायक निलेश ठक्कर यांच्या गाण्यांवर थिरकायला दरवर्षी येथे १५ ते २० हजारांचा समुदाय जमतो. त्याकरिता येथील मैदानावर एक लाख चौरस मीटर लाकडी फळ्या टाकून प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आवाजाची मर्यादा पाळण्यासाठी रात्री दहानंतर वायरलेस हेडफोन लावून गरबाप्रेमी गरबा खेळणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सहा कोटींचा विमा काढण्यात आला असून ७० सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र लक्ष ठेवून असणार आहेत. त्यातील फक्त एक सीसीटीव्ही कॅमेरा पोलीस ठाण्याला जोडण्यात आहे. यावेळी गरब्याच्या निमित्ताने नेत्रदान व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात येणार असल्याचे नायडू क्लब नवरात्रोत्सवचे आयोजक विजय नायडू यांनी सांगितले.

या वर्षी बोरीवलीतील प्रमोद महाजन स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये दांडिया क्वीन फाल्गुनी फाटक हिच्या सूरांवर थिरकण्याची संधी गरबाप्रेमींना मिळणार आहे. इथल्या गरब्याचे आयोजक असलेल्या रुपारेल नवरात्रोत्सवाचे शिवानंद शेट्टी यांनीही, भर पावसातही गरबा सुरू राहील अशी व्यवस्था आम्ही केली असून गरबाप्रेमी मोठय़ा संख्येने हजेरी लावतील, असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणीही संपूर्ण मैदान व्यापेल इतका लाकडी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. तर गायक व वादकांसाठी साडेतीनशे फूट उंचीचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांसाठी स्वतंत्र खोली, रुग्णवाहिका, डॉक्टर आदी व्यवस्था करण्यात आल्याचे शेट्टी म्हणाले.

कच्छी मैदानावर मिराज नवरात्रौत्सवाच्या वतीने आयोजिल्या जाणाऱ्या गरब्यात प्रीती-पिंकी यांची गाणी रंगत भरेल. येथे पावसामुळे होणाऱ्या शॉर्टसर्किटचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून अग्निशमन यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहेत. तसेच ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येथे खबरदारी म्हणून लाकडी प्लॅटफॉर्मवर ताडपत्रीही टाकण्यात आली आहे. दोन्ही प्रवेशद्वाराजवळ लाकडी फलाट बनवण्यात आले आहेत, जेणेकरून गरबाप्रेमींना चिखलातून ये-जा करावी लागू नये. दरवर्षी पाऊस असतोच. त्यामुळे गरबाप्रेमींचा उत्साह तसूभरही कमी होत नाही आणि यंदाही तो कायम राहील, असा विश्वास मिराज नवरात्रोत्सवचे आयोजक जिग्नेश भूटा यांनी व्यक्त केला.

मालाडमध्ये सायलेंटगरबा

मालाड पश्चिमेकडील राजमहाल बँक्वेट येथे लाईव्ह गरब्यासोबत ‘सायलेन्ट’ गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मध्यरात्री दोनपर्यंत गरबाप्रेमींना थिरकता येईल. प्रख्यात गुजराती लोकगायक किशोरदा गढवी हे येथे रंगत भरतील. कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम कर्णबधीर मुलांच्या शाळेला दान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.