22 February 2019

News Flash

Navratri 2018: एसी’च्या गारव्यात गरब्याचा फेर

मुंबई-ठाण्यात अशा प्रकारचे सर्व सोयी-सुविधांनी युक्त गरबा अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

शलाका सरफरे/ दिशा खातू

सुसज्ज बंदिस्त सभागृहांत नवरात्रोत्सव; प्रवेशिका २०० ते हजार रुपयांदरम्यान

भल्या मोठय़ा मैदानात, ध्वनिवर्धकांच्या दणदणाटात, उकाडा-धुळीचे भान विसरून गरबा खेळण्याचे दिवस मागे पडले. पंचतारांकित वातानुकूलित गरबा नाइट्स तरुणांना खुणावू लागल्या आहेत. मुंबई-ठाण्यात अशा प्रकारचे सर्व सोयी-सुविधांनी युक्त गरबा अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.

मुंबई-ठाण्यातील दांडिया-गरबाला एकेकाळी गुजरातच्या गरबापेक्षाही मोठे वलय होते. नामवंत गायक, वादकांच्या सुरावटी, बॉलीवूडमधील कलाकारांची उपस्थिती आणि बक्षिसांची लयलूट यामुळे गरबाप्रेमींच्या उत्साहाला उधाण येत असे. परंतु, वाढते तापमान, धुळीचे लोट, ध्वनिप्रदूषणाबाबतचे र्निबध, पार्किंग, स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे अनेकांचा उत्साह मावळू लागला. ही गैरसोय दूर करण्यासाठी अनेक आयोजकांनी सर्व सुविधांनी सज्ज असे गरबा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. यंदा अशा पंचतारांकित गरबाच्या आयोजकांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसते.

काही संस्थांनी नऊ दिवस तर काहींनी ठराविक दोन-तीन दिवस गरबा आयोजित केला आहे. या गरब्यांच्या प्रवेशिका २०० ते हजार रुपयांदरम्यान आहेत. ठाण्यातील कोरम आणि विवियाना मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गरब्याला प्रवेश विनामूल्य आहे. कोरम मॉलमध्ये १० ते १८ ऑक्टोबर दरम्यान रोज सायंकाळी ७ ते ९ दरम्यान गरबा आयोजित करण्यात आला आहे, तर विवियाना मॉलमध्ये १२ ऑक्टोबरला रात्री ८.३० ते ९ दरम्यान ‘सायलेंट दांडिया’ होणार आहे. भायखळा येथील ‘लायन हार्ट लाऊंज क्लब’मध्ये १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ९ वाजता होणाऱ्या दांडियात मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

वातानुकूलित सभागृह, पुरेशी स्वच्छतागृहे, लॉकर्सची सोय, पार्किंग, खाद्यपदार्थ अशा विविध सुख-सोयींचे आमिष दाखवत पंचतारांकित हॉटेल आणि मॉल गरबाप्रेमींना आकर्षित करत आहेत. अशा ठिकाणी वेळेचीही मर्यादा नाही. काही आयोजकांनी हेडफोनचा वापर करून ध्वनिप्रदूषणरहित गरबा खेळण्याची सोयही दिली आहे. प्रदूषणरहित, आरामदायी आणि सुरक्षित वातावरणात गरबा खेळता यावा, हा यामागचा उद्देश असल्याचे मीरारोड येथील जीएसएस क्लबच्या व्यवस्थापिका मंजीत कौर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दांडियासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे तरुणांचा उत्साह वाढल्याची प्रतिक्रिया सुधीर मोरे या गरबा रसिकने दिली.

First Published on October 11, 2018 2:04 am

Web Title: navratri 2018 garba in ac hall