५०० ते पाच हजारांदरम्यान शुल्क; कलाकारांकडील गर्दीत वाढ

दिशा खातू, शलाका सरफरे

मुंबई / ठाणे : गरबा दांडियासाठी कोणते कपडे घालायचे, त्यावर आभूषणे, केशभूषा काय असावी, यावर महिनाभर आधीच मंथन सुरू करणारी तरुणाई यंदा टॅटूच्याही प्रेमात पडली आहे. नवरात्रीच्या साजशृंगारात आता टॅटू हा महत्त्वाचा घटक ठरू लागला आहे. ज्याच्या-त्याच्या आवडीप्रमाणे ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत टॅटू रंगवले किंवा गोंदवले जात आहेत.

कायमस्वरूपी व तात्पुरते अशा दोन प्रकारचे टॅटू रेखले जातात. टॅटूचा प्रकार, नक्षी आणि आकारानुसार शुल्क आकारले जाते. तात्पुरत्या टॅटूंसाठी ५०० ते दीड हजार रुपये आणि कायमस्वरूपी टॅटूसाठी दोन ते पाच हजार रुपये आकारले जातात.

गेल्या ३-४ वर्षांपासून नवरात्रीसाठी टॅटू रेखाटून घेण्याची फॅशन आली आहे. दंडावर, पाठीवर, कमरेवर, मानेवर, खांद्यावर, मनगटावर, पायावर, छातीवर, पोटावर टॅटू रेखाटण्यावर भर दिला जात आहे. सर्वाधिक टॅटू हे दंड आणि मनगटावर रेखाटून घेतले जात असल्याचे टॅटू कलाकार सांगतात. टॅटू पार्लरमध्ये नवरात्रीच्या १ महिनाआधीपासून गर्दी वाढू लागली आहे. दिवसाला सुमारे २० ते २५ ग्राहक येत असल्याचे टॅटू कलाकार करण खंबाटा यांनी सांगितले. भारतात सर्वाधिक टॅटू हे धार्मिक प्रतीकांचे असतात, असे मालाड येथील ‘एलिअन्स टॅटू’चे संचालक आणि टॅटू कलाकार सनी भानुशाली यांनी सांगितले.

देवीचे नाव, देवीचा चेहरा किंवा फक्त डोळे आणि टिका, मंत्र इत्यादी रेखाटण्यावर अनेकांचा भर आहे. अक्षरे, पक्षी-प्राण्यांचे चेहरे, सुविचार, आई-वडिलांचे चेहरे रेखाटून किंवा गोंदवून घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आता नव्या तंत्रामुळे माणसांचे चेहरे हुबेहूब रेखाटता येतात, अशी माहिती सनी भानुशाली यांनी दिली.

एवढे पैसे खर्च करून काढलेला टॅटू स्पष्ट दिसावा, म्हणून तसे कपडे घातले जातात. हॉल्टर गळ्याचे, बॅकसेल टॉप्स, शॉर्ट्स, बिनबाह्य़ांचे पोशाख परिधान केले जातात.

तजेलदार त्वचेसाठी उपचार

या काळात त्वचा तजेलदार दिसावी म्हणून त्वचातज्ज्ञांकडे जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यासाठी पॉलिशिंग, पार्टी पिल्सचा वापर केला जात आहे. अध्र्या तासात त्वचा चमकदार करणाऱ्या आणि ही चमक चार-पाच दिवस टिकवणाऱ्या उपचारांकडे तरुणींचा कल आहे, असे त्वचाचिकित्सक रिंकी कपूर यांनी सांगितले. लेझर टोनिंगसुद्धा केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.