न्यायालयाचे आदेश सर्वानाच बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. गणेशोत्सवात रस्ता अडवून मंडप उभारणी करणाऱ्यांना स्थानिक प्रशासन व्यवस्थेकडून अभय दिले गेले असतानाच आता नवरात्रीत तर रस्ता अडवून गरब्याचा फेर धरणाऱ्या मंडपांची माहितीही महानगरपालिकेकडे नाही. ध्वनिप्रदूषण मोजणे ही तर फारच दूरची गोष्ट राहिली. मात्र नागरिकांनीच आता पुढाकार घेऊन ध्वनिप्रदूषण मोजण्यास सुरुवात केली असून दहानंतर ध्वनिक्षेपकाला बंदी असली तरी त्यापूर्वी साडेसात वाजल्यापासूनच घराच्या भिंती हादरण्याचा दरवर्षीचा अनुभव या वेळीही येत आहे.
देवीसोबत रात्र जागवण्याच्या पारंपरिक सणाचे स्वरूप ढोल, ताशे यांच्यासोबत डीजेच्या ठणाठणाटामध्ये होत गेले. काही वर्षांपूर्वी ध्वनिनियंत्रण नियमांवर बोट ठेवून न्यायालयाने रात्री दहानंतर दांडियाच्या आवाजावर बंधने आणली. वेळेच्या बाबतीत आता नियंत्रण पाळले जात असले तरी रात्री शांतता ठेवण्याच्या नावाने संध्याकाळी साडेसात वाजल्यापासूनच ध्वनिक्षेपकातून अंगावर काटा उभा करणारे आवाज सुरू होतात. यावेळचा नवरात्रोत्सवही त्याला अपवाद नाही. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडपांजवळ आवाज फाउंडेशनकडून ध्वनिपातळी तपासण्यात आली. बोरिवलीच्या कोरा केंद्रात सुरू असलेल्या मोठय़ा दांडियामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही थडथडत आहेत. या मैदानाजवळ असलेल्या इमारतींच्या गॅलरीतून ८५ डेसिबल पातळीचा आवाज ऐकू येत होता, तर आतल्या बाजूला असलेल्या इमारतीत काचा बंद करूनही आवाजाची पातळी ८० डेसिबलपर्यंत जात होती. कांदिवली व बोरिवली या ठिकाणच्या बहुसंख्य दांडिया उत्सवांच्या ठिकाणीही ८० ते ८५ डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी नोंदवली गेली.
नियमांनुसार दांडियामधील ध्वनिक्षेपक दहा वाजता बंद करण्याचे बंधन असले तरी त्याआधीच्या अडीच-तीन तासांमध्ये माणसाला आजारी पाडता येईल एवढी आवाजाची पातळी वर गेलेली असते. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातील गोंधळाचा त्रास नागरिकांना होत आहे, मात्र त्याविरोधात कारवाई केली जात नाही, अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी दिली.
न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरूनच नवरात्र मंडळांना परवानगी दिली गेली आहे. मात्र हा निर्णय वॉर्ड पातळीवर झाला असून त्याची माहिती संकलित करण्यात आलेली नाही, अशी माहिती महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. किती मंडळांनी परवानगी दिली, किती मंडळांना कोणत्या कारणासाठी परवानगी नाकारली गेली याची माहिती गणेशोत्सवादरम्यान संकलित करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक मंडप रस्त्यावर उभे राहिले होते. नवरात्रोत्सवात तर ही माहितीही गोळा करण्याचे कष्ट पालिकेकडून घेण्यात आले नसून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्याची बाब तर दूरच राहिली आहे.

ध्वनिप्रदूषण नियम
ध्वनिप्रदूषण नियमांनुसार सकाळी सहा ते रात्री दहा या काळात निवासी परिसरातील आवाजाची पातळी ५५ डेसिबल व रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ४५ डेसिबलपेक्षा जास्त नसावी. रुग्णालय, शाळा, न्यायालय, मंदिर यांच्यापासून शंभर मीटरचा परिसर हे शांतता क्षेत्र ओळखले जावे व तेथील आवाजाची पातळी दिवसा ५० तर रात्री ४० डेसिबलपेक्षा जास्त नसावी.